पवार काका-पुतण्या वेगवेगळ्या बैठकांना; राष्ट्रवादीतील दुफळीचे राष्ट्रीय राजकारणातही पडसाद
Sharad Pawar Ajit Pawar : शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला, तर अजित पवार NDA च्या बैठकीला उपस्थित राहणार; दोन्ही बैठकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
मुंबई | 18 जुलै 2023 : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाले. पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन भूमिका समोर येत आहेत. आज राजधानी सत्ताधारी पक्षांची अर्थात NDA ची बैठक होतेय. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे. तर बंगळुरुमध्ये युपीएची अर्थातच विरोध पक्षांची बैठक होत आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहतील.
काका-पुतण्या वेगवेगळ्या बैठकीला
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळे पवार काका-पुतणे वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. आज देशात दोन मोठ्या बैठका होत असताना शरद पवार आणि अजित पवार हे या बैठकांमध्ये उपस्थित असतील. सध्यातरी या दोघांचे मार्ग वेगळे दिसत आहेत.
अजित पवार-शरद पवार यांच्यातील ‘त्या’ तीन भेटी
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात जरी दोन गट निर्माण झाले असले तरी पवार कुटुंबात मात्र एकता असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. आमच्या आजी-आजोबांनी आणि नंतर आई-वडील, काका-काकी यांनी आम्हाला शिकवलं आहे की, काहीही झालं तरी कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. त्यामुळे मी प्रतिभाकाकीला भेटायला गेलो होतो, असं अजित पवार यांनी पहिल्यांदा सिल्हर ओकवर गेल्यावर सांगितलं.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला जात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आपण आमच्यासोबत यावं, अशी विनंती त्यांनी केली. मात्र त्याला शरद पवार यांनी प्रतिसाद दिला नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशीही अजित पवार समर्थक आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले. तिथे त्यांनी पुन्हा सोबत येण्याची विनंती अजित पवार गटाने केली. या सगळ्या घडामोडींनंतरही शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. ते भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र आणि विशेष करून राष्ट्रवादीतील या सगळ्या घडामोडींनंतर देशात आज दोन बैठका होत आहेत. शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या बैठकांना हजर राहणार आहेत.