शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेबाबत आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी; कोणते मुद्दे मांडले जाणार? वाचा सविस्तर…
Shivsena 16 MLA Disqualification Case Hearing Today : शिवसेना पक्षासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस; 16 आमदारांच्या अपात्रेबाबत आज महत्वपूर्ण सुनावणी, विधानभवनातील घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, वाचा महत्वाचे मुद्दे...
मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : आजचा दिवस शिवसेना पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ही सुनावणी होणार आहे. आज दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे आणि शिंदेगटाचे आमदार या सुनाणीसाठी हजर राहणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांची आज एकत्रित सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आज विधानसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडणार आहे. ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट देणार आहे. सुप्रीम कोर्टानं अपात्रतेचा थोडक्यात निकाल दिला आहे, तो विधानसभा अध्यक्षांना दिला जाईल. सुप्रीम कोर्टानं पक्षांतरबंदी कायदा ,गटनेता, व्हीप यावर जे निरीक्षण नोंदवलं आहे. त्याचा अंतर्भाव उत्तरात करण्यात आला आहे.
ठाकरे गटाची आज बैठक
आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. एकत्रित उत्तर देण्यासाठी महत्वाच्या सूचना आमदारांना दिल्या जाणार आहेत. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
राज्याच्या विधानभवनाकडे आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. आमदार अपात्रतेच्या बाबत आज सुनावणी होणार आहे. ठाकरे गटातर्फे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे वकिल देवदत्त कामत आणि अॅड असिम सरोदे यांनी वकिलपत्र दिलं आहे. आज विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही एकत्रित सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी दोन्ही गटानं लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना मानणारे नेते त्यांच्यासोबत राहिले. तर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करणारा गट शिंदेंसोबत गेला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आम्ही मानतो. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पटलं नसतं, असं म्हणत शिंदे गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा लढा पुढे न्यायालयात गेला. न्यायालयाच्या निर्देशांनंतर आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांपुढे आलं आहे.