मुंबई | 11 जानेवारी 2024 : महाराष्ट्रासह संपूर्ण देश ज्या निकालाचा वाट पाहात होता. त्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल संध्याकाळी हा निकाल दिला. यात शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. सोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचंही नार्वेकरांनी म्हटलं आहे. या निकालनंतर ठाकरे गटाकडून आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेत निकालाचा निषेध नोंदवला.
संजय राऊत यांनीही विरोधकांवर टीकेची तोफ डागली. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेना म्हणजे ठाण्याच्या नाक्यावरची पानटपरी नाही, असं ठणकावून सांगण्यात आलं आहे. अखेर चोर मंडळास मान्यता’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. यातून एकनाथ शिंदेंवर प्रहार करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आता विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले – खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच. विधानसभा अध्यक्ष हे कशाच्या आधारावर सांगतात? जेथे विधानसभा अध्यक्षच दिल्लीहून नेमले जातात व त्या घटनात्मक पदावरील व्यक्ती ही पाच वर्षांत चार पक्ष बदलून त्या पदावर बसते तेव्हा त्या व्यक्तीने शिवसेनेसारख्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे स्वामित्व ठरवावे हे धक्कादायक आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन राजकीय विधाने केली – गद्दार आमदारांनी भाजपशी संधान बांधले हे खरे नाही व फुटीर आमदारांनी कोणताही शिस्तभंग केला नाही, पक्षविरोधी कारवाया केल्या नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्रातच हे सांगितले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या की नाहीत हे त्या पक्षाचे प्रमुख ठरवतील. विधानसभा अध्यक्षांना तो अधिकार कोणी दिला?
शिवसेना हा पक्ष म्हणजे ठाण्याच्या नाक्यावरची पानटपरी नाही की कोणीही ऐऱ्यागैऱ्याने जाऊन त्याचा बेकायदेशीरपणे ताबा घ्यावा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, ‘बेंचमार्क’ निर्णय देऊ. प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे. इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली.