पवारसाहेब, मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा; काँग्रेसच्या नेत्याचं शरद पवार यांना आवाहन

| Updated on: Jul 31, 2023 | 1:45 PM

Varsha Gaikwad on Sharad Pawar : नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या पुण्यात एकाच मंचावर येणार; संजय राऊतांपाठोपाठ काँग्रेसचंही महत्वाचं आवाहन

पवारसाहेब, मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा; काँग्रेसच्या नेत्याचं शरद पवार यांना आवाहन
Follow us on

मुंबई | 31 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात असणार आहेत. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या, आमदार वर्षा गायकवाड यांनीही असंच वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्याचा निषेध करतोय.अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाहीये. त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणं, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस तर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे उद्या पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. त्यावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनतेच्या मनात संभ्रम करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये, असं संजय राऊत म्हणालेत.

मणिपूरमध्ये महिला मदतीचा हात मागत होत्या. पण केंद्र सरकारने फक्त तमाशा पाहिला. देशाचे पंतप्रधान फॉरेनला फिरत होते. पण मणिपूरला जायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी काहीही मदत केली नाही. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज संध्याकाळी मशाल मार्च काढत आहोत आणि सरकारचा निषेध नोंदवत आहोत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

रोहित टिळक यांना देखील समज देण्यात आलेली आहे. कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपले सर्व हेवेदावे बाजूला सोडून त्या ठिकाणी विरोध करणं गरजेचं आहे. पक्षाची जी लाईन आहे महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्या खातर त्यांनी पुन्हा एकदा विचार करा, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्यात.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. तुम्ही जर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल, असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे.