ठाकरे गटाकडे मुस्लिम व्होट शिफ्टिंग होतेय?; उद्धव ठाकरे यांनी काय दिलं कारण?
शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महामुलाखत टीव्ही 9 मराठी चॅनल व्यवस्थापकीय संपादर उमेश कुमावत यांनी घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यापासून ते नरेंद्र मोदींची ऑफर आणि तसेच मुस्लीम मतांचं राजकारण या सर्व प्रश्नांवर उत्तरे दिली.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पक्षात मोठी फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेना लोकसभा निवडणूकांना सामोरी जात आहे. या निवडणूका प्रथमच उद्धव ठाकरे यांची शिवसेना धनुष्यबाण या निशाणी ऐवजी मशाल या नव्या निवडणूक चिन्हावर लढवित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आपल्या पक्षातील मतदारांपर्यंत नवीन चिन्हं पोहचविण्यापासूनच आव्हान आहे. टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची महामुलाखत घेतली, त्यावेळी ठाकरे यांनी विविध प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लीम व्होट बॅंक शिफ्ट होतेय काय यावर उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात…
मुस्लीम व्होट आता शिवसेनेकडे शिफ्ट होतेय का ? या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की केवळ मुस्लिम मतांचं शिफ्टिंग होतंय या दृष्टीकोणातून बघाव लागणार नाही. तर ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ या दृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे असे ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना मुस्लिमांना चांगली वाटत आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पण भाजपच्या आणि आमच्या हिंदुत्वात फरक आहे. आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं आहे. तर भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. आमच्याकडे विकास कामांचे मुद्दे आहेत. आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. एखादं संकट येतं तेव्हा धावून जाणारा शिवसैनिक जातपात पाहत नाही. ही आमची ओळख असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आताच्या निवडणुकीत एक नरेटीव्ह, दिशा भाजपला नेता आली नाही. दहा वर्षातील त्यांच्या थापा लोकांना माहीत आहे. दहा वर्ष एकट्या दुकट्याची नव्हे तर सर्वांचीच वाया गेली. ही एक भावना केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर सर्वांच्या मनात आहे. महागाई कुणाला सोडत नाही. बेकारी कुणाला सोडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यात धर्म पाहिला का? 80 कोटी जनतेला मोदी धान्य मोफत देतात. त्यात शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत की नाही ? जर केवळ हिंदू असतील तर 140 कोटीमधील 80 कोटी हिंदू तुमची सत्ता असताना दारिद्रय रेषेखाली का आहेत? वर का गेले नाहीत. त्यांना नोकऱ्या का मिळाल्या नाही. हे या व्होट शिफ्टिंगच्या मागचं मुख्य कारण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने तुमच्यावर मोठे हल्ले केले. टीका केली आहे. या प्रश्नावर ठाकरे यांनी, ‘ हे भाजप पुरतं खरं आहे. कोरोना काळातील सरकारचं जे काम आहे. त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत आहेत. धारावी एक मॉडेल घेतलं तर त्यात सर्वधर्मीय राहतात. तिथे मी कधीच भेदभाव केला नाही. लोकांचा त्यामुळे विश्वास बसला. त्यामुळे फतवा काढायचे दिवस गेले. आता विश्वासाचे दिवस आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्या नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात मी त्यांना दोन लाखांचं शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ केलं होतं. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांची प्रोत्साहन पर राशी दिली होती. याची कुणीच मागणी केलेली नसताना केलं होतं. दरम्यानच्या काळात यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. यांच्या भाकडकथा आहे. एखादं मूल झोपत नसेल तर त्यांना बागुलबुवाची भीती दाखवली जाते. ते मुल रडतंय ना. त्याला भूक लागली. त्याला भीती दाखवून ते कसं झोपेल हे पाहीले जात आहे. आज देशात बेकारीने लोक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना बागुलबुवाची राक्षसांची भीती दाखवून चालणार नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
पाकिस्तानाचा झेंडा यांच्या मनात फडकत आहे
उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकला ? असा आरोप फडणवीस यांनी केला आहे या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवाज शरीफ यांचा पत्ता घ्यायचा आहे. कारण त्यांचे मोदीजी नवाज शरीफांचा वाढदिवसाचा केक न बोलवता खायला गेले होते. मी आडवाणींनाबद्दल काही बोलणार नाही. त्यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यामुळे पाकिस्तानाचा झेंडा यांच्या मनात फडकत आहे. भाजपचा विजय झाल्यावर पाकिस्तान खूश होईल कारण त्यांना वाटेल आया आया अपना मेहमान आया. त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा काढला तर मोदींनी शरीफांचा केक खाल्ल्याने त्यांना ‘केक वॉक’ मिळेल असा टोमणा त्यांनी यावेळी मारला.