ZP Election Result Live : नागपूर, पालघर, धुळ्यासह 6 जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल
सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मुंबई : पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज (बुधवार 8 जानेवारी) जाहीर होणार आहेत. सहा जिल्ह्यांत काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली (ZP Election Result Live Updates) आहे.
विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सत्तानाट्याचा धुरळा खाली बसतो, तोच अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी थंडीचा जोर असूनही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला.
पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यात सरासरी 64 टक्के मतदान झाले, तर धुळे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समित्यांसाठी अंदाजे 60 टक्के मतदान झाले. थंडीच्या प्रभावामुळे सकाळी मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह कमी होता, मात्र दुपारी तीननंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. विशेषतः साक्री, शिरपूर भागातील दुर्गम भागात मतदारांचा उत्साह चांगला दिसून आला. 2013 च्या तुलनेत यंदा अधिक मतदान झालं.
पालघरमध्ये सेना vs भाजप vs काँग्रेस-राष्ट्रवादी
पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावत आहेत.
पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे ‘महाआघाडी’ करुन लढा देत आहेत.
नागपूरचा गड राखण्यासाठी भाजपची कसरत
नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले.
नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही ती जिंकायची आहे.
2012 मधील पक्षीय बलाबल – 58
भाजप – 21 काँग्रेस – 19 शिवसेना – 08 राष्ट्रवादी – 07 बसप – 03
नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
2013 मधील नंदुरबार जिल्हा परिषदेचं संख्याबळ – 56
काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 25 अपक्ष – 01 भाजप – 01 शिवसेना – 00
2013 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.
वाशिममध्ये बहुरंगी लढत
वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 263 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 104 जागांसाठी 461 उमेदवार मैदानात आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तिन्ही पक्षांनी एकत्र यावं, अशी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांची इच्छा होती. मात्र वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीचं समीकरण जुळलं नसून काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडी स्थापन केली आणि वंचित आघाडीसोबत काही ठिकाणी युती केली.
भाजपनेही मित्रपक्षासोबत घरोबा केला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांनी वाशिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर दोन मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना खासदार भावना गवळी, जनविकास आघाडीचे नेते आणि माजी काँग्रेस खासदार अनंतराव देशमुख, भाजप आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्यात एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच पक्ष स्वबळावर जि.प. निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात बहुरंगी लढती होण्याची चिन्हं आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता राहिली. जि.प. बरखास्त होण्यापूर्वी अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे हे विराजमान होते. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 17, राष्ट्रवादीचे 8, शिवसेनेचे 8, भाजपचे 6, अपक्ष 6, तर भारिपचे 3 सदस्य होते. 52 सदस्यांपैकी 27 महिला सदस्या होत्या.
अकोल्यात वंचितसमोर चौरंगी आव्हान
अकोला जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितीसाठी 492 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर भारिप म्हणजे आताच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. या वेळेस थोडंसं वेगळं चित्र दिसत आहे. कारण या वेळेस महाविकास आघाडी झाल्याने आणि भाजपचे चार, तर शिवसेनेचा एक आमदार निवडून आल्याने चित्र थोडं वेगळं दिसून येत आहे. संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उभे केले आहेत. त्यामुळे या दोघा दिग्गजांची कसोटी पाहायला मिळणार आहे….!
अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत असताना या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या 53 गट आणि 105 गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात पाळेमुळे रोवलेल्या भारिप-बमसंला अनेक गणांत ऐनवेळी उमेदवारी देणे कठीण गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेची अनेक गट, गणांतही उमेदवार देताना दमछाक झाली आहे. जिल्ह्यात चौरंगी लढतीचे चित्र असताना भारिप-बमसंच्या उमेदवारांना किमान 15 गट, गणांतील स्वपक्षीय बंडखोर आणि अपक्षांच्या साखळीने आव्हान दिल्याने निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परिषदेची सत्ता भारिपकडेच असल्याने यावेळचे चित्र सांगणे कठीण आहे
धुळ्यात अनिल गोटे विरुद्ध भाजप
जिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.
धुळे जिल्हा परिषद निवडणूक भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे, तसंच धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी गोटेंच्या खांद्यावर सोपवल्यामुळे या निवडणुकीत गोटे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री असाच सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. (ZP Election Result Live Updates)