सामना वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार, आता लढाई कोर्टात अन् रस्त्यावरही!; चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

| Updated on: Aug 19, 2023 | 11:22 AM

Chandrashekhar Bawankule on Saamana Editorial : किंचित सेनेचे पक्षप्रमुख, बोरूबहाद्दर!; सामनातील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर, बावनकुळे यांनी ठाकरे-राऊतांवर निशाणा. सामनाविरोधात तक्रार करणार असल्याचं म्हणत आक्रमक प्रतिक्रिया. पाहा...

सामना वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार, आता लढाई कोर्टात अन् रस्त्यावरही!; चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक
Follow us on

नागपूर | 19 ऑगस्ट 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने असंवेदनशील, अहंकाराचे महामेरू बनले आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामना विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. सामनावर बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही बावनकुळे यांनी टीका केली आहे.

सामना वृत्तपत्राच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत. मुंबईचे नेते आणि कार्यकर्त्यांचा, सामना वृत्तपत्राच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा विचार सुरु आहे. दोन्ही प्रकारच्या लढाईची आमची तयारी सुरु आहे. स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय. ते खपू घेण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं, ते सामनातून आणि संजय राऊतांच्या माध्यमातून बोलतात. सामनातून जी टीका झाली ते उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन आहे. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही. ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं. राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहे. आता ते सत्तेत येऊ शकत नाही हे त्यांचं दु:ख आहे. देवेंद्रजींच्या पाठीत खंजिर खुपसून जी चूक केली. ती लक्षात येत आहे. म्हणून यापद्धतीने आपल्या मुखपत्रातून टीका करत आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि बोरूबहाद्दर, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

बावनकुळे यांचं ट्विट जसंच्या तसं

किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीसजींच्या विरोधात गरळ ओकली.

२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत.

‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत.
पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.

मुख्यमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. त्यात बदल होतील, असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. आम्ही तिन्ही पक्ष सोबत निवडणूक लढणार आहोत. विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून ते काहीही बोलतात. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे विरोधकांचे स्वप्न साकार होणार नाही, असं बावनकुळे म्हणालेत.