हा खोडसाळपणा कुणाचा? की शक्तिप्रदर्शनाचा छुपा अजेंडा? नागपुरातले कट आऊट्स चर्चेत!
नुकत्याच सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपांनाही देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत फेटाळून लावले.
विवेक गावंडे, नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे बॅनर्स किंवा कटआऊट्स लावायचे अन् त्यात फडणवीसांना शिंदेंपेक्षा मोठं दाखवायचं… हा खोडसाळपणा कुणाचा असेल? की फडणवीस समर्थकांनीच शक्तिप्रदर्शन करायचं म्हणून मुद्दाम असे कटआऊट्स लावले? ही शंका येण्यामागील कारण फडणवीसांच्या नागपुरातच घडलंय. विधानसभेचं (Vidhansabha) हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. बुधवारी रात्री विधानभवनाबाहेर हे भव्य कटआऊट्स लागले अन् राज्यात चर्चांना उधाण आलं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी उलथापालथ करून राज्यात शिंदे-भाजपचं सरकार आणण्यात कुणाची चतुराई आहे, हे वेगळं सांगायला नको. एवढं सगळं करून पक्षादेश ऐकून उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी चर्चा झाली. आता नागपुरात लागलेल्या या बॅनर्सवरून पुन्हा एकदा खुसपूस सुरु झाली आहे.
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होतायत. त्यावर व्हॉट्सअपवर निरनिराळ्या शंका उपस्थित केल्या जातायत. एवढी चर्चा झाल्यानंतर आज गुरुवारी सकाळी हे कटआऊट्स काढून टाकण्यात आले. एकनाथ शिंदेंचं मोठं आणि फडणवीस यांचं छोटं कटआऊट लावण्यात आलं.. पण हा खोडसाळपणा कुणी केला, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात, अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नामधारी आहेत, अशी टीका विरोधकांकडून वारंवार होते. उपमुख्यमंत्री पदावर बसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही तसा मान द्यायला ते चुकत नाहीत. पण काही ठिकाणी जिथे शिंदे कमी पडतात, तिथे थेट आपल्या हाती माईक घेऊन विरोधकांना रोखठोक उत्तर देण्याचं कसब राज्याने वारंवार अनुभवलंय.
नुकत्याच सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपांनाही देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत फेटाळून लावले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं. तरीही एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाच्या भ्रष्ट मंत्र्यांना फडणवीस आणि भाजपा पाठिशी घालतंय, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
फडणवीसांबद्दल सहानुभूती- राऊत
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य केलं. शिंदे गटातील भ्रष्टाचारी मंत्र्यांचे आरोप भाजपला फार काळ सहन होणार नाही, फडणवीसांबद्दल मला सहानुभूती वाटतेय, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतरही राजकीय वर्तुळात सरकारच्या अस्थिरतेची चर्चा रंगू लागली आहे.