माझ्यामागे अदृश्य शक्तींचा हात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश इटकेलवार यांचा खळबळजनक दावा
सतीश इटकेलवार यांच्या दाव्याने नागपुरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे इथल्या निवडणुकीत कोण जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
गजानन उमाटे, नागपूरः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघ निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस उत्कंठा वाढवतेय. तर नागपुरातूनही (Nagpur) आता मोठ्या घडामोडी सुरु आहेत. नागपुरात एवढे दिवस चर्चेत नसलेलं नाव आणि या उमेदवाराने केलेल्या दाव्याने आता खळबळ माजली आहे. अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांनी माझ्यामागे अदृश्य शक्तींचा हात आहे, त्यामुळे मीच जिंकून येणार असा छातीठोक दावा केलाय. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नागपुरातून नेमकं कोण जिंकणार याची उत्कंठा वाढली आहे.
अदृश्य शक्ती कोण?
नागपुरातून सतीश इटकेलवार यांनी हे वक्तव्य केल्याने नेमकी अदृश्य शक्ती कोण याचं उत्तर भाजप असं म्हटलं जातंय. मात्र सतीश इटकेलवार म्हणाले, नाशिकप्रमाणे नागपुरच्या निवडणुकीतही अदृश्य शक्ती आहेच. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाही हात माझ्या पाठिशी आहे. देवेंद्र फडणवीस हे देशाचे, महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांचीही साथ मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं इटकेलवार म्हणाले.
महाविकास आघाडीची मतं फोडण्यासाठी सतीश इटकेलवार यांना भाजपनेच उभं केलंय, अशी चर्चाही नागपूरमध्ये सुरु आहे. त्यावर सतीश इटकेलवार म्हणाले, मी १२ तारखेलाच उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, हा निर्णय घेतला होता. अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केले. तुम्ही घेतलेला निर्णय़ योग्य आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
माझ्यासोबत अदृश्य शक्ती म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षच ती शक्ती माझ्यासोबत आहे. संपूर्ण ताकतीने सगळ्या गोष्टी माझ्यासोबत राहणार आहे, असा दावा सतीश इटकेलवार यांनी केलाय.
नागपूर विभागात अनेक जिल्ह्यांमध्ये माझं काम आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. येणाऱ्या दोन-चार दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मी क्रमांक एक वर असेन, असा दावा सतीश इटकेलवार यांनी केलाय.
नागपूरात चौरंगी लढत?
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपकडून एक उमेदवार निवडणुकीस उभा आहे. काँग्रेसचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित सदस्य सतीश इटकेलवार हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर भाजपने अपक्ष उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केलाय. भाजपने पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत नागो गाणार यांचा विजय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. पण नुकतंच सतीश इटकेलवार यांच्या दाव्याने नागपुरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे इथल्या निवडणुकीत कोण जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.