रागा कंपनी नमो कंपनीत विलीन, CA परीक्षेत अवघड बॅलन्सशीट
यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे चित्र 'नमो' विरुद्ध 'रागा' असे रंगवण्यात आले. हाच फिवर परीक्षांमध्ये दिसून येत आहे. सीए परीक्षेतील विद्यार्थ्यांना रागा कंपनीचे नमो कंपनीत विलीनीकरण झाले आहे. याचे ब्लॅन्स शीट तयार करा असा प्रश्न विचारण्यात आला होता
नवी दिल्ली : देशात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी अखेर थंडावली आहे. या निवडणुकीत एनडीए सरकारने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे चित्र ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’ असे रंगवण्यात आले. हाच फिवर परीक्षांमध्ये दिसून येत आहे. नुकतंच CA म्हणजेच चार्टड अकाऊंट या अभ्यासक्रमातील एका पेपरमध्ये विद्यार्थ्यांना नमो विरुद्ध रागा या शब्दांवरुन एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावरुन लोकसभा निवडणुका संपल्या असल्या, तरीही नमो विरुद्ध रागा या शब्दाचा फिवर लोकांच्या मनातून काही उतारायचं नाव घेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुरुवारी 6 जून Institute of Chartered Accountants of India (ICAI) द्वारे सीए म्हणजेच चार्टड अकांऊट या अभ्यासक्रमातील परीक्षेचा पेपर होता. या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना अकाऊंटबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. यात चक्क नमो विरुद्ध रागा अशी नाव कंपन्यांना देण्यात आली होती. नमो म्हणजेच नरेंद्र मोदी आणि रागा म्हणजेच राहुल गांधी हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. यावरुन प्रश्नपत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं कंपनींना कशी वापरली जाऊ शकतात असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारत आहेत. तर एका ठिकाणी सोशल मीडियावर हे पेपर व्हायरल होत आहेत.
काय होता प्रश्न ?
रागा लिमिटेड या कंपनीद्वारे नमो लिमिटेड या कंपनीला सर्व बिलं देण्यात आली आहे. यानुसार 1 एप्रिल 2011 पासून रागा कंपनी आणि नमो कंपनी एकत्रित आली असून, रागा कंपनीचे नमो कंपनीत विलीनीकरण झाले. रागा कंपनीचा व्यवसाय टेक ओव्हर करताना नमो कंपनीने प्रत्येक दोन शेअर्सच्या बरोबरी करत प्रत्येकी 10 रुपयांप्रमाणे तीन पूर्ण इक्विटी शेअर विकत घेण्याचं ठरवलं. तसेच रागा लिमिटेड या कंपनीतील 12 टक्के डिबेंचर्स हे नमो कंपनीत नोंद झाल्यावर 13 टक्के होतील. त्यानुसार विद्यार्थ्यांनी नमो लिमिटेड या कंपनीतील जनरल इंट्री सोडवा. तसेच नमो कंपनीचे बॅलन्सशीट तयार करा, असा प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आला होता.
खरं तर, हा प्रश्न तुम्हाला सर्वसामान्य सीए परीक्षेतील प्रश्नाप्रमाणेच वाटेल. मात्र या प्रश्नात रागा आणि नमो एकत्रित आल्याचं म्हटलं होतं. तसेच रागा कंपनीचे सर्वेसर्वा आता नमो कंपनी असल्याचंही म्हटलं होतं आणि त्यामुळे या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राजकारण सुरु झालं आहे.
या प्रश्नावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. “शैक्षणिक संस्था या राजकारणापासून स्वतंत्र असल्या पाहिजेत. प्रश्नपत्रिकेत राजकीय नेते, राजकीय पक्ष यांसह इतर नावं देण्यात येणे चुकीचे आहे”, असेही त्यांनी म्हटलं.
दरम्यान आयसीएआय ही लोकसभेच्या अंतर्गत स्थापन झालेली एक सरकारी संस्था आहे. सीएच्या या पेपरमध्ये अशाप्रकारचा प्रश्न कोणी टाकला याचा शोध घेणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया याबाबत आयसीएआयचे परीक्षा संचालक दुगेश काबरा यांनी दिली.