दान गुप्त ठेवा उघड़ करू नका ईडी लागते, नाना पटोले यांची ईडीच्या कार्यपद्धतीवर टीका
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
गोंदिया : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल वक्तव्य केलं आहे. दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही तर ईडी (ED) मागे लागते असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. गोंदियातील कुनबी मेळाव्याच्या जाहीर सभेत नाना पटोले यांनी वक्तव्य केली आहे. भाजपाने या देशातील जनतेला एप्रिल फुल बनविले असून दररोज देशातील जनता एप्रिल फुलमध्ये जगत आहे. तर ज्या घोषणा भाजपाने करून केंद्रात सत्तेवर आलेत. त्या सर्व घोषणा विसरून त्यांनी जनतेला एप्रिल फूल बनवलं असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
दान हे गुप्त ठेवा नाही तर ईडी लागते
गोंदियात कुणबी समाजाचे सभागृह,वाचनालय,व वसतिगृह बांधण्यात येत असून यावेळी आयोजकाने या कामात कोणी काय निधी दिला याची यादी वाचली होती. त्यावर नाना पटोले यानी बोलाताना मी यात कोणतेही पैसे दिले नाहीत. दान हे गुप्त ठेवा नाही तर ईडी लागते असा टोला त्यांनी ईडीला लगावला आहे. तर दुसरीकडे तुम्हाला कोणतीही मदत लागली तर माझ्याकडे या माझ्या नावात “नाना” आहे म्हणून पैसाच पैसा आहे काही कमी पडू देणार नाही असा विश्वास ही त्यांनी आयोजकांना दिला आहे.
भाजप नेत्यांनीच देशातील जनतेला एप्रिल फूल बनवलं
भाजपने या देशातील जनतेला एप्रिल फूल बनविले असून दररोज देशातील जनता एप्रिल फूलमध्ये जगत आहे. ज्या घोषणा भाजपने करून केंद्रात सत्तेवर आले, त्या सर्व घोषणा विसरून त्यांनी जनतेला एप्रिल फूल बनविलं, आता भाजप नेत्यांनी दुसऱ्यांना नावे ठेवण्यात काही अर्थ नाही.भाजप नेत्यांनी टिंगलटवाळी सोडून महागाई,बेरोजगारीवर चर्चा करण्याचा सल्ला नाना पटोले यांनीदिला आहे. या देशाला बर्बाद करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.
नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ईडीनं कारवाई केली होती. सतीश उके यांना ईडीनं नागपूरमधून ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सतीश उके सध्या ईडी कोठडीत आहेत. दरम्यान नाना पटोले यांनी ईडीच्या कारवायांबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं दखल घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.