लम्पी आजाराबाबात नाना पटोले यांचा अजब आणि अत्यंत हास्यास्पद दावा
हस्यास्पद दावा करताना नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
भंडारा : सध्या देशात लम्पी आजाराने(lumpy illness) थैमान घातले आहे. गाईंसह अनेक जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी चिंतेत आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत असले तरी हा रोग पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी लम्पी आजाराबाबात अजब आणि अत्यंत हास्यास्पद दावा केला आहे.
लम्पी रोग हा नायजेरिया मधून आल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. हा दावा करताना नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वाढदिवशी आणलेले चित्ते हे नायजेरिया मधून आणले आहेत. चित्त्यावरील ठिपके आणि लम्पी आजार झाल्यावर जनावरांच्या शरीरावर येणारे ठिपके हे सारखे आहेत असे नाना पटोले म्हणाले.
हा मोदींचा एक कट आहे. चित्ते नाही तर विदेशातील आजारच मोदींनी देशात आणल्याचा हस्यास्पद दावा पटोले यांनी केला आहे.
आतापर्यंत 2000 हजार वर्षांपासुन देशात जनावरांमध्ये लम्पी रोग नव्हता. नायजेरिया मधून हा लम्पी रोग आलाय. चित्ते पण नायझेरीयातून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान व्हावं म्हणून पंतप्रधान मोदींनी हे चित्ते आणल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
नायजेरियामधून चित्ते आणल्यामुळे काय फायदा झाला? रोजगार मिळाला का? यातून विदेशी आजार आणुन शेतकऱ्यांना बरबाद करण्याचं काम होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
सरकारकडे लम्पी रोग बरा करण्यासाठी काही औषध नाही. यावर प्रभावी लस सापडलेली नाही. लम्पी आजारामुळे बैलबाजार बंद केले गेले आहेत. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. यामुळे अशा प्रकारचे कट रचले जात असल्याचेही ते पुढे म्हणाले.
लम्पी हा स्किन डिसीज अर्थात त्वचेचा रोग आहे. लम्पीची लागण झालेल्या पशुंना ताप येतो. त्यांच्या शरीरावर गाठी येतात. या आजारामुळे अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे.