कोण म्हणतंय पाठिशी भाजप नाही? नांदेडचे खासदार म्हणतात, बंडखोराच्या केसालाही धक्का लावला तर..
नांदेडमध्ये बंडखोर आमदार आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत शिवसैनिकांचे आंदोलन केलं. बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयावर आणि घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.
नांदेडः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामागे नेमकं कोण आहे? भाजप आहे की शिंदेंचीच ताकद अचानक एकाएकी एवढी वाढलीय? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडलेत. आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने एकदाही या सगळ्या फुटीमागे भाजप असल्याचं मान्य केलेलं नाही. एरवी दररोज कुणा-कुणावर आरोप-प्रत्यारोप करणारे भाजपचे नेतेही शांत बसून उसवलेल्या शिवसेनेचं नाट्य पहात आहेत. पडद्यामागे भाजपाच आहे, असा आरोप विरोधक करतायत पण शिंदे गटाकडून एकदाही याला पुष्टी मिळाली नाही. नांदेडमध्ये मात्र भाजप खासदार प्रताप पाटील (Prataprao Patil) यांनी थेट इशारा दिलाय. शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असं छातीठोकपणे त्यांनी सांगितलं. तर बालाजी कल्याणकरांविरोधात नांदेड येथील शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केलं.
केसालाही धक्का लावला तर…
नांदेडचे भाजप खासदार म्हणतात, बंडखोर आमदाराच्या केसालाही धक्का लागला तर पहा.. pic.twitter.com/abylrRZKGf
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2022
नांदेडचे बंडखोर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल झाले आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात निदर्शनं करत आहेत. मात्र बालाजी कल्याणकरांच्या केसालाही हात लावण्याची कोणात हिम्मत करू नका, असा इशारा येथील भाजप खासदारांनी दिला आहे. कल्याणकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिक हल्ला करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली. कल्याणकर हे शिवसेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपानेही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी खासदार चिखलीकर यांनी दिली.
कल्याणकरांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
नांदेडमध्ये बंडखोर आमदार आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत शिवसैनिकांचे आंदोलन केलं. बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयावर आणि घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. मालेगाव रोडवर आमदार कल्याणकर यांचे कार्यालय आणी निवावसस्थान आहे. दुपारी पत्रकार परिषद घेतल्या नंतर थेट शिवसैनिक आमदार कल्याणकर यांच्या घरावर धडकले. काही शिवसैनिकांनी आमदार कल्याणकर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धक्काबुक्की, रेटारेटी झाली. परिस्थती चिघबळण्याची परिस्थिती होती. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या गोंधळामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.