Narayan Rane : आदित्य ठाकरे बालिश… ‘त्या’ प्रश्नाचा नारायण राणे यांनी एका वाक्यात निकाल लावला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना बालिश संबोधले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते असं म्हटलं होतं. त्यावरून राणे यांनी ही टीका केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडत होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असं विधान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली. खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. आदित्य ठाकरे सत्य तेच बोलले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना बालिश म्हणत त्या प्रश्नाचा एका वाक्यात निकाल लावला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो. एकनाथ शिंदे भाजपसोबत नाही गेले. ते शिवसेना पक्ष घेऊन आले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. तुम्ही आता शाळेतील मुलांचेही प्रश्न विचाराल का? असा संतप्त सवाल नारायण राणे यांनी केला आहे. अशा प्रश्नांची का दखल घेता. मी त्याचा उत्तर देणार. बालिशपणा आहे. काहीही बोलतो. कोणत्या वर्षात बोलले होते? असंही राणे म्हणाले.
राऊतांनी किती जॉब दिले
संजय राऊत यांनी केंद्राच्या रोजगार मेळाव्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शाखाप्रमुखांशी केली होती. राऊत यांच्या या प्रश्नावरही त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. अरे सोड संजय राऊत. मी काय संजय राऊत यांच्यावर टीका करायला बसलो नाही, असं राणे म्हणाले. तसेच शिवसेनेने आतापर्यंत कुणाला रोजगार दिला? एका तरी शिवसैनिकाला रोजगार दिला का? संजय राऊतांनी एक जॉब दिल्याचं दाखवावं. अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी किती जॉब दिला? शिवसैनिकांना किती दिला? त्याचा आकडा द्यावा, असं आव्हानच त्यांनी दिलं.
विरोधकांकडे उपाय आहेत काय?
देशात रोजगार निर्मितासाठी योजना तयार केली. त्यांतर्गत रोजगार मेळावा घेण्यात आला. देशाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. 10 लाख नोकऱ्या देणार आहेत. आतापर्यंत तीन लाख नोकऱ्या दिल्या आहेत. विरोधी पक्षांना बेरोजगारी वाढली म्हणायला काय अर्थ आहे? उपाय त्यांच्याकडे आहे का? उपाय मोदीच देत आहेत. वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत. विरोधकांकडे बोंबलण्याशिवाय काही राहिलं नाही. रोजगार नियुक्तीचं प्रमाणपत्र देण्याबाबतचा हा कार्यक्रम आहे. उद्धव ठकारे आणि संजय राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नाही, अशी टीकाही त्यांनी केली.