मुंबई ते कोकण, नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ठरली, राज्य सरकारचे वाभाडे काढणार!
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं आहे. त्यासाठी नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत.
मुंबई : केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं आहे. त्यासाठी नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. मुंबईपासून कोककणपर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे.
नारायण राणे हे 19 ऑगस्टपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत. 19 आणि 20 ऑगस्ट असे दोन दिवस ही यात्रा मुंबईत नियोजित आहे. त्यानंतर 21 ऑगस्टला वसई विरार, मग 23 ऑगस्टला दक्षिण रायगड, 24 ऑगस्टला चिपळूणमध्ये जाणार आहे. 25 ऑगस्ट रत्नागिरी आणि 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग येत, नारायण राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. मंत्री झाल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच थेट जनतेपर्यंत जाणार आहेत.
राज्याचे वाभाडे काढणार
दरम्यान, नारायण राणे यांनी पाच दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला होता. “सव्वा महिना झाला राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी 16 तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चाललंय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील”, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.
केंद्राचे निर्णय जनतेला सांगणार
केंद्र सरकारने जे चांगले निर्णय घेतले आहेत ते कसे जनतेपर्यंत घेऊन जायचे याची एक रूपरेषा तयार करत आहोत. याची माहिती जनतेला देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो; राणेंचा राऊतांना टोला