“साहेब…आता मलाच मुख्यमंत्री करा, उद्धव ठाकरेंची शरद पवारांना विनंती?” काय घडलं त्या रात्री? राणेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याच दैनिक प्रहारमधून उत्तर दिलंय. गेले दोन दिवस दैनिक प्रहारमधून नाराय़ण राणे दसरा मेळाव्याला काय उत्तर देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याच दैनिक प्रहारमधून उत्तर दिलंय. गेले दोन दिवस दैनिक प्रहारमधून नाराय़ण राणे दसरा मेळाव्याला काय उत्तर देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय वादामुळे नारायण राणे यांनी हार आणि प्रहार या मथळ्याखाली थेट शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. हिंतम असेल तर अंगावर घ्या वेळ आणि तारीख सांगा असं थेट आव्हान राणेंनी दैनिक प्रहार मधून दिलंय. दैनिक प्रहारमधून नारायण राणें यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नारायण राणेंचा दावा काय?
हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग
‘मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!! याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’ कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट ! संजय राऊत बरोबर बोलतात. सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास!!, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर राणेंचे प्रहार
हिंमत असेल तर शिंगावर घ्या दिवस आणि वेळ कळवा, असं आव्हान नारायण राणे यांचं शिवसेनेला दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर आता नारायण राणे यांच्यांकडून ‘प्रहार’ दैनिकात हार आणि प्रहार सदराखाली उत्तर दिलं जातंय. साहेब असताना पुत्रकर्तव्याला जागले नाहीत ते आता पुत्रकर्तव्याला कसे जागणार? ‘प्रहार’मधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. नवीन आलेल्या घाबरट आणि पुळचट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही,असंही राणे म्हणाले. कुणाच्या गालाला पाच बोटे देखील न लावणारे हिम्मत असेल तर अंगावर या म्हणणात यापेक्षा मोठा विनोद कोणता?, असा सवाल देखील त्यांनी केलाय. सत्तेसाठी हिंदुत्वशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे 1925 मध्ये स्थापन झालेल्या RSS ला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत, अशी टीका राणेंनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दैनिक प्रहारमधून सर्व आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारा मथळा छापला गेलाय.
इतर बातम्या:
हिम्मत असेल तर शिंगावर घ्या, वेळ आणि दिवस कळवा, राणेंचा ‘प्रहार’ vs ठाकरेंचा ‘सामना’!
Special Report | ‘प्रहार’मधून गुरुवारी ठाकरेंवर राणेंचा ‘बाण’!
Narayan Rane claimed Uddhav Thackeray urge to Sharad Pawar for post of Chief Minister wrote column in Daily Prahar