सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु; राणेंचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
सिंधुदुर्ग : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. सत्ताधारी पक्ष आपली माणसं सांभण्याचं काम करत आहेत. आधी एकानं केलं, आता शिवसेना करत असल्याचं सांगत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली.(Narayan Rane criticizes Sanjay Rathod and Chief Minister Uddhav Thackeray)
संजय राठोड संत आहेत काय? – राणे
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा खोचक सवाल विचारतानाच आरोपांना उत्तरं द्या पळताय कशाला, अशा शब्दात राणे यांनी राठोडांना आव्हान दिलं आहे. सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसं लायसन्स दिलं आहे का? असा सवाल करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.
‘समाजाने बलात्काऱ्याच्या मागे जाऊ नये’
एखाद्या समाजाने जो विकासकामं करतो त्याचा मागे जावं. बलात्काऱ्यांचे मागे समाजानं जाऊ नये, असा सल्लाही राणे यांनी बंजारा समाजाला दिला आहे. या प्रकरणातील एवढ्या क्लिप बाहेर आल्या पण अद्याप काहीही कारवाई केली नाही. कारवाई केली तर लोक आपल्याला सोडून जातील, अशी भीती या सरकारला असल्याची टीकाही राणेंनी केली. हे सरकार पवारांच्या कृपेमुळं बसलं, मुख्यमंत्र्यांनी किमान त्यांचं तरी ऐकावं, असा खोचक सल्लाही राणे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांपेक्षा एखादा सरपंच हुशार
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री हे अजूनही घरात बसून कामकाज हाकतात. मंत्रालयात येत नाहीत. त्यामुळे त्यांचेच मंत्री त्यांचं ऐकत नाहीत. गर्दी जमवू नका सांगितलं तरी त्यांच्या मंत्र्यानेच पोहरादेवी गडावर गर्दी जमवली. आता त्यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार? असा प्रश्न राणेंनी विचारला आहे. राज्यातील कुठलाही सरपंच हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार आहे. कारण, राज्यातील कुठल्याही सरपंचाला कायद्यांची माहिती जास्त आहे. अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
संबंधित बातम्या :
संजय राठोड यांना चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ यांचा घणाघात, पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप
Narayan Rane criticizes Sanjay Rathod and Chief Minister Uddhav Thackeray