मुंबई : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर भाजप नेत्यांवरही ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. महत्वाची बाब म्हणजे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा पुनरुच्चार केलाय. तसंच अजून काही नावं घेत राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय.
‘मी वाचलं की एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली होती नक्षलवाद्यांना. हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठे केलेली कर्तबगार माणसं शिवसेनेत उपजायला लागली, त्यावेळेला एक एकाला कमी करण्याचं काम यांनी केलं. रमेश मोरेची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधवची हत्या कुणी केली? ठाण्याचा एक नगरसेवक, त्याची हत्या कुणी केली? नारायण राणेने शिवसेना सोडली, देशाबाहेरच्या गँगस्टरला सुपारी दिली. मी वाचलो तो माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे. तोंड उघडू नये, ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोलले की आम्हाला असं असं काम मिळालं आहे. तुम्ही सावध राहा, नाहीतर दुसरं कुणी हे काम करेल’, असा सणसणाटी आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरही राणेंनी जोरदार टीका केलीय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट म्हणतो त्या भावनेतून एक केविलवाणा प्रयत्न व्यथा म्हणून त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडलाय. ते व्याकूळ झाले आहेत. ते म्हणत आहेत मुख्यमंत्रीपद गेलं तरी मला दु:ख नाही. मी त्यांना फार जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दुष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचं ना शिवसैनिकांचं ना हिंदुत्वाचं कोणतंही हित किंवा काम केलं नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्याचं काम. आता सांगत आहेत की मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याच वेळेला गद्दारांनी सरकार पाडलं. शिवसैनिक होते, ते निवडून आले. सत्ता आणली आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी जमलं नाही, उद्धव ठाकरे पक्षपात करायला लागले. त्यामुळे दुसरा गट तयार करुन शिवसेनेच्या नावावर त्यांनी सत्ता स्थापन केली, असा दावा राणेंनी केलाय.
राणे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय. संजय राऊतने पहिलं काम केलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करणे. आता त्यांच्या जमखेवर मिठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. संजय राऊत मनातून खूश आहे की मी विजयी ठरलो. माझ्या गुरूने, पवारसाहेबांनी दिलेलं काम करण्यात मी यशस्वी ठरलो, असा टोला राणेंनी राऊतांना हाणलाय. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की माझीच माणसं विश्वासघातकी ठरली. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांनंतर कोणत्या शिवसैनिकाला, नेत्याला विश्वास दिलाय. मातोश्रीबाहेर तुम्ही कोणत्या शिवसैनिकाच्या मदतीला धावलात? त्यांना प्रेम, विश्वास दिलात का? असा सवालही राणेंनी केलाय.