नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर टांगती तलवार, राणे गटात अस्वस्थता
नारायण राणे यांचा भाजप (Narayan Rane joining BJP) प्रवेश होणार की नाही यावर आता मोठं प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.
रत्नागिरी: नारायण राणे यांचा भाजप (Narayan Rane joining BJP) प्रवेश होणार की नाही यावर आता मोठं प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे 3 दिवस राहिले आहेत. असे असताना पुन्हा एकदा राणेंचा भाजप प्रवेशाचा (Narayan Rane joining BJP) अंदाज हुकला आहे. त्यामुळे मुंबईत तळ ठोकून असलेल्या नारायण राणेंच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. राणेंचं नक्की काय चाललंय असाच काहीसा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचं अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे राणेंच्या गोटात धडकी भरली आहे. विधानसभेच्या तोंडावर राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन होण्याच्या हालचाली वाढल्या होत्या.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कोकणात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी राणेंचा प्रवेश नक्की असल्याचं सुतोवाचही केलं. त्यामुळे राणेंना चांगलाच दिलासा मिळाला होता. मात्र, आता विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरायला केवळ 3 दिवस बाकी असताना राणेंच्या प्रवेशाचं सुत काही जुळता जुळत नाही.
राणेंचे पुत्र नितेश राणे हे आपल्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यासाठी मुंबईत रवाना झाले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या तारखा अजूनही पुढे ढकलत आहेत. आज नितेश राणे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, नितेश राणे फोन उचलत नसल्याने यालाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राणेंचा पक्ष प्रवेश पुन्हा लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राणेचा भाजप प्रवेश पितृपक्ष संपल्यानंतर होणार असं बोललं गेलं. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात राणेंचा प्रवेश होणार होता. नंतर घटस्थापनेला राणेंचा प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र, अनेक मुहुर्त हुकले असून आता गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला प्रवेश निश्चित होईल, असं बोललं जात आहे.
एकीकडे युतीची घोषणा झाली आहे. कणकवली विधानसभा सोडून शिवसेना आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आले आहेत. त्यामुळे राणेंना पक्षात घेवू नका हा सेनेचा दबदबा भाजपवर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राणेंच्या पक्षाच्या मुखपत्रात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त 2 ऑक्टोबर असा सांगण्यात आला. त्यामुळेच राणेंच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.
राणे मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचंही समोर येत आहे. विशेष म्हणजे राणेंनी आपल्या मुलांना थेट प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राणेंच्या पक्ष प्रवेशाला सेनेची आडकाठी असल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपने याचा योग्य पद्धतीने उपयोग करत राणेंना शांत ठेवलं आहे.
नितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा, राणे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, निवडणूक अर्ज भरण्याचे दिवस संपत आले आहेत, सेनेने राणेंना भाजपमध्ये घेण्यास खो घातलाय असा घटनाक्रम सुरू आहे. हे सर्व भाजपच्या पथ्थावर पाडत आहे. त्यामुळे भाजपनं राणेंना सध्या वेटिंगवर ठेवलं आहे. आता नेमका काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.