राणेंचे भविष्यातील स्वप्न हे स्वप्नच राहतील : विनायक राऊत
नारायण राणे हे स्वतःच भाजप प्रवेशाची घोषणा करत आहेत, भाजपातून कुणीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहतील, असं विनायक राऊत म्हणाले.
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची घोषणा केली. त्यावरुन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली. राणे स्वप्न पाहत आहेत, पण त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहतील, असा टोला राऊतांनी (Vinayak Raut Narayan Rane) लगावला. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कारण, मुख्यमंत्र्यांनी नुकतंच नाणार रिफायनरी प्रकल्प परत आणण्याचे संकेत दिले होते.
राणेंच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेवर विनायक राऊत म्हणाले, “नारायण राणेंची ही कितवी घोषणा आहे? यापूर्वी 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि आता म्हणतायत मुंबई… या स्वतःच जाहीर करत चाललेले तारखा आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या अधीकृत नेत्याने ही जाहीर केलेली तारीख नाही. त्यामुळे स्वप्न बघायची सवय नारायण राणेंना झालेली आहे. भविष्यातील हे स्वप्न, स्वप्नच असेल, सत्य नसेल.”
नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका
नाणार ग्रीन रीफायनरी प्रकल्पावरून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी रिफायनरी समर्थकांनी महाजनादेश यात्रेसाठी कोकणात आलेल्या मुख्यमंत्र्यांची रत्नागिरीत भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे एक लाख भूमीपुत्र नोकरीला लागतील. सर्वांची मागणी असेल तर आपण पुन्हा विचार करू, असं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली.
“लंकेत सोन्याच्या विटांचा फायदा मुख्यमंत्र्यांना होईल, पण आमच्या कोकणच्या भूमीला होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीपेक्षा कोकणातील पाटबंधारे प्रकल्प जे बंद केलेले आहेत, सिंचनाच्या प्रकल्पाला एकही नवीन पैसा तुम्ही देत नाही, ते पैसे तरी देण्याची व्यवस्था करा. आमचा सुजलाम सुफलाम कोकण याच माध्यमातून करण्याची आमची तयारी आहे.
नाणारचा अभ्यास करण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हेच मुळात दुर्दैवी आहे. तुम्ही एक लाख लोकांना नोकऱ्या देणार म्हणता, पण ते कोणाला देणार? बिहारचे 25 हजार, बंगालचे 25 हजार, तामिळनाडूचे 25 हजार आणि अन्य भारतातले 25 हजार, झाले एक लाख. मात्र नेमका भूमीपुत्र कुठे भेटणार आहे तिथे?
आजपर्यंत जेथे प्रकल्प झालेले आहेत ते मुख्यमंत्र्यांनी जरा भिंग लावून पाहावं, आपले प्रकल्पग्रस्त कोणत्या युनिटमध्ये काम करतात का? उलट परप्रांतियांच्या आक्रमणाखाली आपल्या भूमीपुत्रांना देशोधडीला लावण्याचं काम अशा मोठ्या प्रकल्पातून होत असतं. राजापूर ते रत्नागिरी इथले जे बिल्डर असोसिएशन, हे असोसिएशन, ते असोसिएशन या लोकांनी पुढे केलेले हे समर्थक अशांना जर मुख्यमंत्री भूमीपुत्र मानत असतील तर ते दुर्दैवी आहे.
या ठिकाणच्या भूमीपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या, आमच्या भूमीमध्ये आमच्याशी बोला. ते न करता अशा पद्धतीने जे कोण उभे केलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री जात असतील तर त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणारवासीय प्रकल्पग्रस्त हे त्यांचा हा कुटील डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.”