Narayan Rane : नारायण राणे भाजपनं टाकलेल्या तुकड्यांवर जगतात, अंबादास दानवेंचा राणेंवर हल्लाबोल; राणेंच्या अस्तित्वाबाबतही सवाल
राणे यांच्या टीकेला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. शिवसेनेचे औरंगाबादेतील आमदार अंबादास दानवे यांनी राणेंवर हल्ला चढवलाय. नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात. त्यांच्यावर काय बोलायचं, अशी खोचक टीका दानवेंनी केलीय.
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलीय. तू काय दिलं वडिलांना मनस्ताप, संताप, त्रास. त्यांचं स्वास्थ्य बिडण्याचं कारण हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे. घरातून पळून गेला, दोन वेळा पळून गेला. विचारा त्यांना कुणी परत आणलं, या नारायण राणेने परत आणलं आणि आमचं घर तोडायला खोटे नाटे आरोप करुन. लाज वाटायला हवी’, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय. राणे यांच्या टीकेला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. शिवसेनेचे औरंगाबादेतील आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राणेंवर हल्ला चढवलाय. नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात. त्यांच्यावर काय बोलायचं, अशी खोचक टीका दानवेंनी केलीय.
कोकणात किती हत्या झाल्या? त्याचा आरोप कुणावर?
अंबादास दानवे म्हणाले की, आता बऱ्याच जणांना कंठ फुटू लागले आहेत. आज नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात. त्यांच्यावर काय बोलायं. बाळासाहेबांच्या विचाराला छेद देत राणेंनी गद्दारी केली. आज नारायण राणेंचं राजकीय अस्तित्व काय आहे? शिवसेना सोडल्यानंतर त्यांची राजकीय पत काय आहे? उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि कार्यपद्धती जनतेला माहिती आहे. त्यांना सुपारी देण्याची सवय आहे. मनात आहे तेच ओठांवर येतं. कोकणात किती हत्या झाल्या? त्याचा आरोप कुणावर आहे? हे महाराष्ट्राला माहितीय. ते सत्तेसाठी पक्ष बदलणारे आहेत. त्यांना अयोध्या कुठे आहे हे माहिती आहे का? असा खोचक सवालही अंबादास दानवेंनी केलाय.
नारायण राणे स्वार्थी माणूस – राऊत
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही राणेंना प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे स्वार्थी माणूस आहे. सत्तेसाठी घाणेरडी वृत्ती आहे. अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला असता तर उपमुख्यमंत्री पद वाट्याला आलं नसतं. दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री व्हावं लागतं. अजून आठच दिवसात हे एकमेकांच्या उरावर बसतील. मंत्रीपदावरुन गोंधळ होणार, असा खोचक टोलाही विनायक राऊतांनी लगावलाय.
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
‘माझे वडील, माझा वारसा आहे. वारसा रक्तानेच असतो का? विचाराने नसतो? साहेबांचे किती विचार आत्मसात केले आणि किती आत्मसात केले सांगावं त्यांनी. साहेबांना किती प्रेम दिलं, किती सहवास दिला? त्याच्या अधिकपटीने दु:ख दिलंय, त्रास दिला. एक दिवस क्रमवार यांनी दिलेला त्रास मला सांगावा लागेल. छळलं अक्षरश: आणि आज मोठा साहेब साहेब म्हणतो. याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर मोठं शून्य म्हणजे उद्धव ठाकरे. माझ्या वडिलांचा फोटो चोरता, माझ्या वडिलांचं नाव चोरता… काय बोलतो वडिलांबद्दल? ते आमचं दैवत. त्या वेळेला साहेब असताना त्यांचं काही ऐकलं नाही. पण आम्ही साहेब सांगतील ते ऐकत गेलो. हे तू केलंस का? अशी प्रश्नांची सरबत्तीच राणेंनी केलीय.