Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेलेले, मी परत आणलं, नारायण राणेंचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे हे घर सोडून दोन वेळा पळून गेलेले, त्यांना मीच परत आणलं, असा दावा नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत व्हावी आणि त्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रतिक्रिया येणार नाही, असं होणारच नाही. उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहताच नारायण राणेंनी लगेच आजच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे कपटी आहेत, संजय राऊतांमुळे (Sanjay Raut) सरकार पडलं, तर बाळासाहेबांचे नाव घेण्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या परवानगीची गरज नाही, अशा विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी तुफान बॅटिंग केली. मात्र यावेळी बोलता-बोलता नारायण राणे एक अशी गोष्ट बोलून गेले जी आजपर्यंत कोणीच महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकली नव्हती. उद्धव ठाकरे हे घर सोडून दोन वेळा पळून गेलेले, त्यांना मीच परत आणलं, असा दावा नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. नारायण राणे यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
पळून जाण्याचा नेमका किस्सा काय?
याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा आमचा अधिकार आहे. ते आमचे वडील नसले तरी ते आमचे दैवत आहेत. आणि दैवताचं नाव घ्यायला आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायची गरज नाही. त्यांनी काय दिल वडिलांना? ताप संताप दिला, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वास्थ्य बिघडायला कारण हे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे दोन वेळा घरातून पळून गेले, आठवत असेल तर त्यांना विचारा त्यांना दोन वेळा परत कुणी आणलं? त्यांना दोन वेळा या नारायण राणेंनी परत आणलं आणि आमचं घर तोडायला हा निघाला असे म्हणत नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरूष
संजय राऊत आणि आता बास करावं. आता पुन्हा शिवसेना उभी करून दाखवा. तुमच्यात श्रम करायची तयारी आहे का? कुठेतरी भिंतीला झाडाला टेकून आम्ही रात्री काढल्या आहेत. तेव्हा शिवसेना उभी राहिली आहे. तेव्हाचे शिवसैनिक कसे वाढले? कसे जगले? याची कल्पना या लोकांना नाही. साहेबांच्या तोंडून शब्द निघाला की त्याची अंमलबजावणी एका तासात व्हायची असे शिवसैनिक तेव्हा होते. त्यातला एक तरी शिवसैनिक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे का हे दाखवा. साहेबांची ताकद त्यांच्या विचारात होती, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष होते, त्यांचं नाव घ्यायला त्यांच्या घरच्यांना विचारला जायची आम्हाला गरज नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट बजावलं आहे.