नरेंद्र मोदींकडून राज्यसभेत ‘राष्ट्रवादी’चं कौतुक!
निषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांची पाठ थोपटली
नवी दिल्ली : एकीकडे शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ‘महासेनाआघाडी’ स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे. निषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांची पाठ थोपटली (Narendra Modi Praises NCP in Rajyasabha).
‘सदनात संवाद असणं आवश्यक आहे. घमासान वादावादी झाली तरी चालेल, मात्र अडथळे आणण्याऐवजी संवादाचं माध्यम वापरलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल यांनी वेलमध्ये न उतरण्याचा निश्चय केला आहे. या पक्षांनी संसदीय निकषांचे काटेकोरपणे पालन केले आहे. ते कधीही ‘वेल’मध्ये गेले नाहीत. तरीही त्यांनी आपले मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. मात्र त्यामुळे ना राष्ट्रवादीच्या राजकीय प्रवासाला लगाम बसला, ना बीजेडीचा मार्ग खुंटला. त्यांचं कोणतंही राजकीय नुकसान झालेलं नाही. माझ्या पक्षासह इतरांनीही त्यांच्याकडून शिकायला हवं. यावर चर्चाही व्हायला हवी आणि त्यांचे आभारही व्यक्त करायला पाहिजेत.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi in Rajya Sabha: Today I want to appreciate two parties, NCP and BJD. These parties have strictly adhered to parliamentary norms. They have never gone into the well. Yet, they have raised their points very effectively. Other parties including mine can learn from them. pic.twitter.com/TXvUUOWJin
— ANI (@ANI) November 18, 2019
सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सुनिल तटकरे आणि डॉ. अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील चार खासदारांसह राष्ट्रवादीचे पाच खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत.
‘आपल्या देशात एक मोठा कालखंड होता, जेव्हा विरोधी पक्षाकडून फारशी दमदार कामगिरी होत नव्हती. त्यावेळी सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना मोठा फायदा झाला. पण त्यावेळीही सदनात असे अनुभवी लोक होते, ज्यांनी शासन व्यवस्थेत कधी हुकूमशाही येऊ दिली नाही. हे आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय आहे’, असंही मोदी म्हणाले.
‘या सदनाचा (राज्यसभा) आणखी एक फायदा असा आहे की प्रत्येकासाठी निवडणुकीचा आखाडा पार करणं, सोपी गोष्ट नसते. परंतु देशहिताच्या दृष्टीने काही जणांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यांचा अनुभव, त्यांचं सामर्थ्य मौल्यवान असतं. राज्यसभेचा फायदा असा आहे की शास्त्रज्ञ, कलाकार आणि खेळाडू असे बरेच लोक इथे येतात, जे लोकशाही पद्धतीने निवडले गेले नसतात. बाबासाहेब (आंबेडकर) हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ते लोकसभेवर निवडून येऊ शकले नाहीत परंतु ते राज्यसभेवर पोहोचले. बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशाला खूप फायदा झाला’, असे उद्गारही मोदींनी काढले.
दिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा
‘राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनात सहभागी होणे हे माझं भाग्य आहे. संसद हे भारताच्या विकासयात्रेचं प्रतिबिंब आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि या सभागृहाने बदललेली परिस्थिती आत्मसात केली. सदनातील सर्व सदस्य अभिनंदन करण्यास पात्र आहेत’, असं मोदी (Narendra Modi Praises NCP in Rajyasabha) म्हणाले.