नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसीतून अर्ज दाखल करणार
वाराणसी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 11 एप्रिलला विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यातच येत्या 26 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली […]
वाराणसी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 11 एप्रिलला विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यातच येत्या 26 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय उमेदवार प्रचारदौरा, सभांचे आयोजन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील देशभरात प्रचारदौरे करत असून त्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशातील मेरठ, सहारनपूर आणि अमरोह या ठिकाणी प्रचारसभा आयोजित केल्या होत्या. पण नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत स्वत: वाराणसीमध्ये एकही प्रचारसभेचं आयोजन केलेलं नाही.
दरम्यान, येत्या 26 एप्रिलला नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करतेवेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान 2014 ला नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपकडून रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होते.
वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, तमिळनाडूतील काही शेतकरीही नरेंद्र मोदींच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाराणसी लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.