त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
मला दहा पंधरा सरपंचांनी फोन केला. सर्वपित्री अमावस्या आहे. तुम्ही नाही? असं त्यांनी विचारलं. मी त्यांना विनोदांनी सांगितलं की, इथे कुणी तरी भात ठेवला आहे. तिथे कावळे येऊन घास खात आहेत. पण मी पाहतोय. पण माझे वडील आले नाही... अशी आमची अवस्था होणार असेल तर आम्ही पाहायचं कुणाकडे? असा भावनिक सवाल अजितदादा गटाचे नेते नरहरळी झिरवळ यांनी केला आहे.
पेसा कायद्यांतर्गत आदिवासी मुलांची भरती व्हावी या मागणीसाठी अजितदादा गटाचे नेते, राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. मंत्रालया शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस थांबण्याची विनंती केली. आज भेट देऊन चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण भेटीची वेळ अद्याप ठरलेली नसल्याने झिरवळ अस्वस्थ झाले आहेत. नरहरी झिरवळ अस्वस्थ, हतबल आणि हताश झाले आहेत. विद्यार्थी घरी येऊन बसले आहेत, त्यांना काय तोंड दाखवू? असा सवाल करतानाच आजचाच दिवस आपण वाट पाहणार असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
नरहरी झिरळव यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना आपली वेदना बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांचा आवाज जड झाला होता. डोळे भरून गेले होते. पेसा अंतर्गत भरती सुरु व्हावी म्हणून आम्ही गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना तोडगा काढण्याची विनंती केली होती. पण या प्रश्नाकडे सरकार संवेदनशीलपणे पाहत नाही असं म्हणावं लागेल. पण सरकार आणि सरकारपुढे असलेली आव्हाने आम्हीही मान्य करतो. आम्ही सुद्धा तसं काही चुकीचं मागत आहे, असं नाही. तुम्हाला अडचण येत आहे, असं नाही. मुख्यमंत्री म्हणाले, आजच्या दिवस थांबा. परवा सुनावणी होईल. सुनावणी दरम्यान निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह निकाल झाला तरी कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून आदेश काढू, असं नरहरी झिरवळ म्हणाले.
सरकार गोल गोल फिरवतंय
काल योगायोगाने सुनावणी 14 तारखेला गेली आहे. त्यानंतर किती तारखा पडेल माहीत नाही. पण त्या ऐवजी सरकारने वेगळा पवित्रा घ्यायला लावू नये ही विनंती आहे. आज मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलीय. पण ती फिक्स नाही. आम्ही वाट पाहत आहोत. मुख्यमंत्र्यांचा व्याप अधिक आहे. आम्हाला त्यातल्या त्यात थोडा वेळ द्यावा. ही अपेक्षा आहे. सरकार गोल गोल फिरवतंय असं मुलांमध्ये वातावरण आहे. सरकार विचारात घेत नाही असं या मुलांचं म्हणणं आहे. ही मुलं वेगळ्या स्टेपला जाण्याच्या मनस्थितीत आहेत. आम्ही या मुलांना थांबवत आहोत, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.
आम्ही वेटिंगरवर, पोरं निराश
आम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं. आम्ही काल वाट पाहिली. आजही वाट पाहू. त्यानंतर आम्ही सांगू आमचं ऐकलं जात नाही. आम्ही वेटिंगवर आहोत अजून. मुलांमध्ये निराशा आहे. पण आजच काही घडलं पाहिजे असं नाही. सरकार वेळ मारून नेत आहे, असं आम्हाला फोनवरून कार्यकर्ते, पदाधिकारी, मुलं सांगत आहेत. पण आम्हाला न्याय हवा आहे. माझ्या घरी सुरुचीवर मुलं-मुली येऊन बसली आहेत त्यांना मी काय तोंड दाखवणार? त्यामुळे मी आज पक्ष कार्यालयात जाऊन बसलो. नंतर इथे येऊन दोन तास बसलो आहे (भावुक होऊन), असं ते म्हणाले.
आजचा शेवटचा दिवस आहे. आज वाट पाहू त्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं. शांततेत एक दिवस बसलो. त्याचा रिझल्ट काही आला नाही. तसंच बसलो तर चांगला रिझल्ट येईल असं वाटत नाही. बघू काय करायचं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
आमचा अहवाल का नाही घेतला?
धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. सर्वोच्च न्यायालयात धनगर आरक्षण रिजेक्ट झालंय. हायकोर्टात रिजेक्ट झालंय. पुन्हा समिती का तयार केली जाते? आता एक समिती स्थापन केली. त्याचा अहवाल घेतला जातो. मग टाटा इन्स्टिट्यूटने अहवाल यायचा बाकी आहे. आता स्थापन झालेल्या समितीचा अहवाल तात्काळ येतो. पण चार वर्षापूर्वी टीआयएसचा अहवाल का आला नाही? त्या अहवालाची कार्यवाही का झाली नाही? असा सवाल त्यांनी केला.
उग्र आंदोलन होऊ शकतं
टीआयएसची नियुक्ती सरकारनेच केली होती ना? टीआयएस रजिस्टर संस्था आहे. परवा तासाभरात कमिटीस स्थापन केली जाते. पण वर्ष दोन वर्ष अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल घेतला जात नाही. तिला घटनात्मक अधिकार नाही तर मग का नेमली होती? आम्ही शांत राहायचं ठरवलं, तरी जनता किती वेळा ऐकेल? मुलं किती वेळा ऐकतील हा प्रश्नच आहे. शांततेचा कोणताच रिझल्ट मिळत नसेल तर उग्र आंदोलन होऊ शकतं. ते होऊ नये ही सरकारला विनंती आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
आईवडील समजदार आहेत
दोन तासापासून इथेच बसलो आहे. विद्यार्थ्यांकडे पाहणं अवघड झालंय अंथरून नाही. मच्छर चावत आहेत. उघड्यावर असतात. मी दिसलो तर पाच पंचवीस मुलं येतात. साहेब कसं होणार? काय करायचं असं विचारत आहेत. उत्तर देता येत नाही. त्यामुळे पार्टी कार्यालयात जाऊन एखादा तास दीड तास बसतो. बापूंचं दर्शन घेतलं. परवा आंदोलन केलं. त्यांना नतमस्तक झालो. म्हटलं बापू काही नको आता., सरकारला सुबुद्धी द्या. आमच्याकडे सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाते. आमच्या घरात मी प्रमुख आहे. सर्वपित्रीच्या दिवशी गोडधोड करून पूर्वजांना आमच्या विधीप्रमाणं घरावर घास टाकायचा असतो. घरून फोन येत आहे, मी म्हणतो आईवडील समजदार होते. ते पाहत असतील. मी काही ना काही चांगल्यासाठीच त्यांना घास भरवू शकलो नाही, असं म्हणताना त्यांचे डोळे भरून आले होते.