नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडलेला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल, असं अनेकांना वाटतं आहे. रासप पक्षाकडूनही या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा बोलून दाखवण्यात आली आहे. महादेव जानकर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, असं म्हटलं आहे.
आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या म्हणून. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद हवं, असं जानकरांनी म्हटलं आहे. आमचं हेलिकॉप्टर जर लॅन्ड झालं तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ, असंही त्यांनी म्हटलं.
भाजपला मित्र पक्षाची गरज आहे.पण त्यांनी मित्र पक्षाची वाट लावली आहे. आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे, असं महादेव जानकर म्हणालेत. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महादेव जानकर बंड करण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
आम्ही भाजपसोबत आहे. आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही, अशी खंतही जानकरांनी बोलून दाखवली आहे.
आम्ही NDA मध्ये आहोत. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो NDA मध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल, असं महादेव जानकर म्हणालेत.
मी इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिकल वागतो. ज्याच्यामागे लोक आहेत, त्याला सोडायचं आणि ज्याच्या मागे कुणीही नाही, त्याला घ्यायचं, असं भाजपचं धोरण आहे. त्यांना कपालेश्वर बुद्धी देवो, असं महादेव जानकर म्हणाले.
भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. मी स्वतःला सांगतो, की महादेव जानकर स्वतःला मोठा कर…. त्यावेळी मीडिया देखील मागे येईल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे.
पंकजा मुंडे यांना BRS पक्षाने ऑफर दिली आहे. त्यावर पंकजाताई मुंडे माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव आहेत. त्या हुशार आहे. त्यामुळे त्या योग्य तो निर्णय घेतील. मी सल्ला देण्याइतपत मोठा नाही, असं जानकर म्हणाले.