संकटमोचकांची किमया, नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध
नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत.
नाशिक : नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत अनोखे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा पक्षाला संकटातून तारत महापौरपद राखण्यास मदत केली. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी (Nashik Mayor BJP Unopposed) बिनविरोध निवडून आले आहेत.
नाशिकमध्ये महासेनाआघाडीत पहिल्याच निवडणुकीत ‘महा’फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनही काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतली. सतीश कुलकर्णी हे नाशिकचे 16 वे महापौर ठरले आहेत.
ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, भाजपने मागितली मनसेकडे टाळी
नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत काही नगरसेवकांची फोडाफोडी होऊ शकते, या भीतीने पक्षाने आपले नगरसेवक अज्ञातस्थळी नेले होते. मात्र सात नगरसेवकांनी या सहलीला जाण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. हे नगरसेवक भाजपमधून राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपला धास्ती वाटत होती.
नाशिकचं महापौरपद कायम राखण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचा मोठा हात मानला जातो. नगरसेवकांची फोडाफोडी रोखण्यात महाजनांना यश आल्यामुळे भाजपला महापौरपद कायम राखण्यात यश आलं. रंजना भानसी यांच्याकडे आतापर्यंत महापौरपदाची धुरा होती.
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि मनसे यांची गुप्त बैठक पार पडली होती. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे पाच नगरसेवक किंगमेकर ठरणार होते.
नाशिक महापालिका पक्षीय बलाबल
भाजप – 65 शिवसेना – 35 काँग्रेस – 07 राष्ट्रवादी – 07 मनसे – 05
Nashik Mayor BJP Unopposed