नाशिक : शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजिनामा दिला. तर विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. एक-एक नेता पक्ष सोडत असतानाच विधान परिषदेतही ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद आपल्या पक्षाकडे असावं. अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ‘वारी, आपल्या दारी’ या राष्ट्रवादीच्या उपक्रमाबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. तसंच आगामी निवडणुकांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
विधान परिषदेत आता बरोबरीचे संख्याबळ आहे. जर महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडं असावं, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटणं साहजिक आहे, असं मिटकरी म्हणालेत.
तसंच मिटकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचं नावही सुचवलं आहे. भाजपला वेठीस धरायचं असेल आणि त्यांची कोंडी करायची असेल, तर एकनाथ खडसे हे अभ्यासू नेते आहेत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी, असं ते म्हणालेत.
अब्दुल सत्तार यांच्याबद्दल केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. जोपर्यंत पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. तोपर्यंत भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. ज्या दिवशी विस्तार होईल, त्या दिवशी तुम्हाला दोन्ही गटांमध्ये मारामाऱ्या झाल्याचं दिसेल, असं मिटकरींनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पार्टी वारीत सुद्धा वैचारिक प्रदूषण करत आहे. राज्याला पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचे विचार देण्यासाठी ही वारी. ‘वारी, आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. हिंदू समाजाबद्दल इतर समाजामध्ये आकस निर्माण करण्याचे पाप भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून भाजपने वारीमध्ये विषारी प्रदूषण आणण्याचे काम केले आहे आणि ते धुण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मिटकरींनी सांगितलं.
खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, असं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून दिसतं. भरत गोगावले हे प्रतोद म्हणून तसंच एकनाथ शिंदे हे गटनेते म्हणून बेकायदेशीर असल्याने, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जो काही मेळावा होत आहे, त्याला काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही, असंही मिटकरी म्हणालेत.