सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा झाल्या तर…; राष्ट्रवादीतील अंतर्गत बदलांवर अब्दुल सत्तार म्हणाले…
Abdul Sattar on Supriya Sule : शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार, सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार? अब्दुल सत्तार यांची सविस्तर प्रतिक्रिया
नाशिक : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार असल्याची चर्चा होतेय. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षा झाल्या तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या आवडण्याने न आवडण्याने फरक पडला असता, तर मी माझी प्रतिक्रिया दिली असती, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते, त्यांनी काय करावं, हे माझ्या सारख्या कार्यकर्त्याने सांगण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत. त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाला असतो. तो त्यांनी घेतला, अंतिम निर्णय तेच घेऊ शकतात. मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याइतका मोठा पुढारी नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
वज्रमूठ सभेवरही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वज्रमूठ फार मोठी झाली. फार पक्की झाली आणि त्याचे परिणाम असे दिसत असतील तर मला फार बोलायची गरज आहे का? तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर ते चालवणं. त्यांना निवडणुकीपर्यंत नेणं. सहिसलामत निवडणूक लढवणं तारेवरच्या कसरती पेक्षा कमी नाही. वज्रमूठ सभा कशामुळे रद्द झाल्या? उन्हामुळे रद्द झाल्या की त्यांच्या पक्षात ऊन जास्त झालं म्हणून झाल्या, असं सत्तार म्हणाले आहेत.
सामना अग्रलेखावरही सत्तार यांनी भाष्य केलंय. सामनामध्ये काय छापून आलं. त्यापेक्षा माझ्याकडे फारशी माहिती नाही. मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. आमच्या पक्षाचे प्रमुख त्यावर बोलतील. त्यांच्या पक्षातील भाजपमध्ये कोण येणार, त्यांना विचारायला पाहिजे. मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. राजकारणात कुणी कुठे जावं, हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला काहीही चालू शकतं.एकनाथ शिंदे आमचे पक्ष प्रमुख, त्यांना जे चालेल, ते आम्हाला सर्वांना चालेल, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.