न्याय झाला, राहुल गांधी पुन्हा खासदार झाले!; खासदारकी बहाल होताच छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत
Chhagan Bhujbal on Rahul Gandhi : मोदी आडनावावरील टीका, शिक्षा, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा आणि पुन्हा खासदारकी बहाल; काँग्रेसमधील घडामोडींवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नाशिक | 07 ऑगस्ट 2023 : राहुल गांधी यांनी मोदी हे आडनाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्यावर आक्षेप घेण्यात आला. सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला. त्यानंतर आज राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. याच काँग्रेसकडून स्वागत केलं जात आहे. शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना न्याय दिला आहे. पुन्हा राहुल गांधी खासदार झाले आहेत, असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे. त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केलंय. 14 जागा अद्याप शिल्लक आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं छगन भुजबळ म्हणालेत.
ज्यांना ओबीसीचं काम करायचं आहे त्यांनी करावं. ओबीसींच्या प्रश्नासाठी जे कुणी काम करतील त्याचा आनंद आहे. माझा कुणालाही विरोध नाही, असं भुजबळांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशकात भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नोकरी महोत्सवाच्या होर्डिंग्जवर शरद पवार यांचा मोठा फोटो पाहायला मिळतोय. नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाच्या बाजूलाच नोकरी महोत्सव भरला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना भुजबळांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार महोत्सव होत आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांचा दररोज वाढदिवस आला पाहिजे, असं तरूणाईला वाटतंय, असं ते म्हणाले.
12 डिसेंबरला शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसाला काही कार्यक्रम घेता येईल का याचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीला असे कार्यक्रम घ्या. मला आनंद होईल. एक दिवस डीजे लावून कार्यक्रम न करता दररोज असे कार्यक्रम करा, असं भुजबळ म्हणालेत.
उद्योग धंद्यांसंदर्भात काही करता येईल का याचा विचार केला पाहिजे. यापूर्वी आपण अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. 75 हजार युवकांना नोकरी देण्याचा मानस आहे. पूर्वी पेक्षा नाशिकमध्ये 15 ते 20 वर्षात आमूलाग्र बदल झाला आहे. नाशिक मुंबई रस्त्यात आता खड्डे झाले असतील तरी मोठा रस्ता झालाय, असं त्यांनी सांगितलं.