राजजी, तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतच पवारसाहेबांनी शिवरायांचा उल्लेख केला होता, जरा आठवून बघा- छगन भुजबळ
Chhagan Bhujbal on Raj Thackeray Statment About Sharad Pawar : राज ठाकरेंच्या प्रश्नाला छगन भुजबळ यांचं पुराव्यासह उत्तर; पुण्यातील त्या मुलाखतीचा दिला दाखला
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल रत्नागिरीत सभा झाली. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्याला आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी फेब्रुवारी 2018 ला पुण्यातील बीएससीसी कॉलेजला मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा दाखला छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मी 1991 पासून शरद पवारांसोबत आहे. अनेक वेळा पवारसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतात. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचही राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली. सर्वांना सोबत घेतलं. पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीत फार मोठं काम केलं. म्हणून पवारसाहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहेत. दिल्लीत सगळेजण महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा लीडर असं म्हणतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील नेता असा होतो. असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं, असं भुजबळ म्हणालेत.
माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुम्ही जर शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेतलं तर? छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील नाव घ्या. प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम शाहू, फुले, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं नाव घ्या बिघडतं कुठं?, असा सवाल भुजबळांनी राज ठाकरेंना विचारला आहे.
मध्यंतरी दोन तीन दिवस शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आमचे राष्ट्रवादीचे देखील अनेक नेत्यांचे चेहरे टीव्हीवर दिसत होते. लोकांना पण बरं वाटलं. तीच-तीच भांडणं बघण्यापेक्षा नवीन काहीतरी पाहायला मिळालं, अशीही मिश्किल टिपण्णी छगन भुजबळ यांनी केली आहे.