नाशिक | 05 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात होत असलेल्या 122 व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संभाजी भिडे यांच्या महत्मा गांधी यांच्या विषयीच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
मी सामना वाचत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे, पण महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून केलेल्या वक्तव्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल दिलासा दिला आहे.राहुल गांधी यांना याप्रकरणी अहमदाबाद हायकोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काल सर्व सांगितलं आहे. कालपर्यंत न्यायालयावर टीका करणारे विरोधक कालपासून सर्वोच्च न्यायालयाचं गुणगान गात आहेत, याचं समाधान आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
महाराष्ट्र पोलीस दल शिस्त बद्ध पोलीस दल आहे. नवीन आव्हानं पेलण्याकरिता पोलीस दल सज्ज आहे. सायबर सेल देखील सक्षम कार्य करत आहे. देशातील सर्वात मोठं पोलीस दल हे महाराष्ट्रातलं आहे. मागील तीन वर्षात भरती होऊ शकलेली नाही. मोठ्या प्रमाणात भरती करू पण प्रशिक्षण देऊ शकत नाही. त्याचा विचार केला जातोय, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.