संजय राऊत यांच्यासारख्या भाडोत्री माणसावर काय बोलणार?; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र
Sanjay Raut : संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना महत्व देऊ नये; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र
नाशिक : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच कर्नाटकच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय बोलणार असं म्हणत विखे पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाहीये. संजय राऊतांकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल माहिती नाही. संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, असं टीकास्त्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांवर डागलं आहे.
कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया
कर्नाटकमध्ये निवडणुकीचा निकाल लागत आहे. यात भाजप पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरवातीचे कल येत आहेत. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काही खूप फरक नाही. खूप मोठा फटका नाही पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल, असं विखे पाटील म्हणाले.
स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगळे असतात. केंद्राशी याला जोडणे बरोबर नाही. अँटी इन्कमबन्सीचा परिणाम जाणवतो. पूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया देतो, असंही ते म्हणालेत.
सीमावर्ती भागातील प्रश्न अन् भाजपची भूमिका
सीमावर्ती भागातील प्रश्नांसंबंधी भाजपची काय भूमिका आहे? या प्रश्नावर विखे पाटील बोललेत. सीमा प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपची आहे. विरोधीपक्षाने यावर राजकारण केलं. सीमा भागात देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतल्या. सीमा भागातील नागरिकांचा भाजपावर विश्वास आहे. सीमाप्रश्नी तोडगा काढण्याचीच आमची भूमिका आहे, असं विखे पाटील म्हणालेत.
वाळू माफियांच्या मुजोरीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.वाळू माफियांचा मोडकळीस काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जो धोरण वाळू संदर्भात घेतले आहे ते यशस्वी होईल. थोडा वेळ लागेल पण आम्ही यशस्वी ठरू. काही ठिकाणी याला वाळू माफिया अडचणी आणत आहेत. एक महिन्या भरात प्रत्येकांना वाळू 600 रुपयात मिळेल, असंही विखे पाटील म्हणाले.