मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, कारण…; रामदास आठवले यांचा भरसभेत खुलासा
Ramdas Athwale on Railway ticket : असेल देशात नरेंद्र मोदींची आंधी, तर मला मिळेल मंत्रिमंडळात संधी!; रामदास आठवले यांची कविता तुफ्फान व्हायरल...
नाशिक : अनेकदा अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडही आकारला जातो. पण राजकीय मंडळी विनातिकीट प्रवास करत असतील असं कुणाच्या ध्यानी मनीही येऊ शकत नाही. पण केंद्रीय राज्य मंत्र्यांनी आपण विना तिकीट प्रवास करत असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. केंद्रीय रामदास आठवले यांनी आपण विनातिकीट प्रवास केल्याचं सांगितलं आहे.
मी काही कधी रेल्वेचे तिकीट काढत नव्हतो. कारण प्रत्येकवेळी स्टेशनवर माझ्या स्वागताला शंभर दीडशे माणसं असायची. मग कोणता टीसी मला तिकीट विचारेल? त्यामुळे मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये दलित पँथर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पँथर चळवळीतील अग्रगण्य नेत्यांचां सत्कार सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शालिमारमधल्या कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात भाषण करताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिपदावरही त्यांनी भाष्य केलं.
जर देशात असेल नरेंद्र मोदी यांची आंधी तर मला का मिळणार नाही मंत्री मंडळात संधी जर आमच्यावर कुणी केला अत्याचार, तर आम्ही करतो गावबंदी
तुम्हाला प्यायचा असेल, तर प्या आमचा चहा तुम्हाला नसेल प्यायचा, तर पेऊ नका आमचा चहा पण आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहा
मी कधी बोललो नाही खोटं मला पँथरने केले मोठं माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं तरी पँथरने मला केलं मोठं मी कधीच कुणाची केली नाही चाकरी आय बहिणींनी दिली मला भाकरी
मला आवडायची नाशिकची चिकन करी म्हणून मी जायचो यांच्या घरी जय भीम चा बुलंद आवाज मी ऐकत होतो गाण्यात म्हणून मी चालत होतो पँथरच्या पाण्यात
आम्ही कुणाच्या विरोधात नाही पण एकदा आम्ही खवळलो, की कुणाच्या बापाला घाबरत नाही
रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये म्हटलेली केलेली कविता सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही कविता तुफ्फान व्हायरल होत आहे.