हिंदूत्व नाही तर, नेता खतरे में है!; संजय राऊत यांचा नितेश राणे यांच्यावर थेट निशाणा
Sanjay Raut On Nitesh Rane : त्र्यंबकेश्वर मंदीर अन् हिंदुत्व; संजय राऊत नितेश राणे यांच्यावर बरसले
नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदू अजिबात खतरे में नाही, ते स्वत: खतरे में आहेत. हिंदूत्व नाही तर, नेता खतरे में है!, असं संजय राऊत म्हणालेत. हिंदू खतरे में है, असं म्हणत आंदोलन करण्यात आलं, त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांआधी नितेश राणे यांनी नाशकात जाऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं.
संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे पुन्हा त्या वादग्रस्त प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. काही दिवसापूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुण मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याने वाद झाला होता. या मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला आवाहन देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.
अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही. संजय राऊत यांनी ते सिद्ध करून दाखवावं, असं म्हणत नितेश राणे आणि आचार्य तुषार भोसले यांनी आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
अतिशय शांतता असलेली ही त्र्यंबकेश्वरची वास्तू आहे. मधल्या काळात काही जण ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हा पण येऊ शकलो असतो पण शांतता भंग होईल म्हणून मी आलो नाही. ही काही राजकारण करण्याची जागा नाही. पण काही जण याठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. काही जण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. गोदावरी जवळजवळ इथून गायब झाली आहे. या संदर्भात विकास झाला पाहिजे, अशा ऐतिहासिक जागांच्या विकासासाठी प्राधिकरण झालं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
कोणीतरी पोर येतात आणि हिंदुत्व बद्दल बोलतात. धूप दाखवल्यामुळे हिंदुत्व धोक्यात येत नाही. इतका हिंदुत्व धर्म कमजोर नाही. धर्मात तेढ निर्माण करून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून निवडणुका जिंकता येत नाहीत. हे आता त्यांना कळून चुकलं आहे. ज्यांनी गोमूत्र शिंपडले ते मूर्ख लोक आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.