नाशिक : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात आहेत. पंढरपूरमध्ये जात ते विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. केसीआर यांच्या कृतीने पंढरपूरनगरीचा अपमान आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला. आंबेडकरांच्या या कृतीवर आठवले यांनी भाष्य केलंय.
केसीआर पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं जाईल, याची काळजी घ्यावी. पण काल आपण पाहिलं की केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे अत्यंत चुकीचं आहे. पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. असं आठवले म्हणालेत.
त्यांना खायचे असेल तर त्यांनी तेलंगणा मध्ये जाऊन मटण खावं. एकादशी तोंडावर असताना खाणं, हा अपमान आहे, असं ते म्हणालेत.
पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. ते आलेत. दर्शन घेतील. याला विरोध असण्याचं कारण नाही. पण या सगळ्याचा फारसा या राज्यात फायदा होणार नाही, असं आठवले म्हणालेत.
तेलंगणामध्ये BJP आणि TDP एकत्र येऊन केसीआर यांची सत्ता घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण BRS चा महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही, असंही ते म्हणालेत.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला. यावरही आठवले यांनी भाष्य केलंय. औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणी जाणं अयोग्य आहे. आंबेडकरी चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे. औरंगजेबला पाठिंबा देणारी नाही, असं आठवले म्हणालेत.
आमचं मुस्लिम समाजाला आवाहन आहे की, आमचं सरकार आपल्यासाठी देखील कामं करत आहे. राज्यातील अन् देशातीव नागरिकांचं संरक्षण करणं, आमची जबाबदारी आहे. त्यांनी मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचं आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं आठवलेंनी म्हटलंय.
मंत्रिमंडळविस्तारात संधी मिळावी, असं आठवलेंनी म्हटलं आहे. मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजप जात आहे. NDA च्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जातो. महाराष्ट्रात अशा मीटिंग होत नाही. त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी, मित्र पक्षाला जागा मिळावी, अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केली आहे.