एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर! म्हणाल्या, ‘राऊत, आव्हाडांविरोधात गुन्हे मागे घ्या, आम्ही तिघी धुमधडाक्यात…’
उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या नाशिक पश्चिम भागातील त्या युवतीसेना उपजिल्हाधिकारी आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची ऑफर दिल्याने राज्यभरात त्या चर्चेत आल्या आहेत.
चंदन पूजाधिकारी, नाशिकः संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करेन, अशी मोठी ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आज भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. या दोन्ही नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश करेन, असं वक्तव्य नाशिकच्या माजी नगरसेविकेने केले आहे. शिवसेना नेत्याने एकनाथ शिंदे यांना अशा आशयाचे उपरोधिक पत्रही पाठवलं आहे.
ज्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातात, त्यांचा काही दिवसांनी भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश दिला जातो, असा आरोप नेहमी केला जातो. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातले गुन्हे मागे, घ्या, मीच शिंदे गटात प्रवेश करते, अशी अनोखी ऑफर उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने दिली आहे.
भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने आज रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केलं आहे. तर नाशिकच्या माजी नगरसेविकेने गूगली टाकत ही ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिली आहे.
नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या किरण गामणे या माजी नगरसेविकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपरोधिक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय….
महोदय, गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तीगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले. तुरुंगात डांबले. याप्रमाणे खा. संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली. सर्व प्रकार निषेधार्ह आहे.
मा. जितेंद्र आव्हाड व खा. संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तत्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू…
जय महाराष्ट्र….
किरण पुंजाराम गामणे या नाशिकमधील माजी नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या नाशिक पश्चिम भागातील त्या युवतीसेना उपजिल्हाधिकारी आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची ऑफर दिल्याने राज्यभरात त्या चर्चेत आल्या आहेत.