नाशिक जिल्हा परिषदेत भाजपची माघार, अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे
भाजप उमेदवाराने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे बाळासाहेब क्षीरसागर यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिली होती.
नाशिक : नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या बाळासाहेब क्षीरसागर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड (Nashik ZP President Election) झाली आहे. तर महाविकास आघाडीचेच उमेदवार सयाजी गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
भाजपचे उमेदवार जे. डी. हिरे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे क्षीरसागर यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिली होती. बाळासाहेब क्षीरसागर हे शिवसेनेचे उमेदवार होते.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला दणका देत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावली होती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत व्यूहरचना आखली होती.
अडीच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने पहिल्यांदाच स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली होती. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नाशिक जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची निवडणूक होती. याही निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली होती.
राज्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वच समीकरणं वेगळी झाली होती. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची धुरा संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली होती.
नाशिक जिल्हा परिषद सदस्य संख्या – 73
शिवसेना – 25 भाजप – 15 राष्ट्रवादी काँग्रेस – 16 काँग्रेस – 08 माकप – 03 अपक्ष – 05
काँग्रेसच्या उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ 43 झालं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीचा अध्यक्ष (Nashik ZP President Election) होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.