National Film Awards : ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान’, मुख्यमंत्री शिंदेंकडून कलाकारांचं अभिनंदन
सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट 'सुमी' ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘सुमी’ ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे (Rahul Deshpande) यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), ‘फ्युनरल'(सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट), ‘जून, गोदाकाठ, अवांछित’ (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असून, त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पार्श्वगायनात राहुल देशपांडे यांनी बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. जून या मराठी चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार विवेक दुबे यांच्या ‘फनरल’ला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.
अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी तर अभिनेता सूर्याला ‘सूरराय पोट्रू’साठी जाहीर झाला आहे. ‘1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर’साठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ आणि थ्री सिस्टर्स यांना घोषित करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अपर्णा बालमुरली यांना ‘सूरराय पोट्रू’साठी आणि सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार ‘सायना’साठी मनोज मुंतशीर यांना जाहीर करण्यात आला.
(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)