“जेम्स बॉन्ड असणारे अजित डोवालही या कटात सहभागी”, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले “राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना…”
सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वेषांतरावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आता यावरुन एका शिवसेना खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे वक्तव्य केले आहे.
Sanjay Raut Allegation On Ajit Doval : “महायुतीसोबत सत्तास्थापन करण्यापूर्वी दिल्लीत अमित शाह यांची अनेकदा भेट झाली. या भेटीसाठी मी अनेकदा मास्क आणि टोपी घालून विमानाने प्रवास केला. विमान प्रवासासाठी मी स्वतःचे नावही बदलले होते”, अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिली होती. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त भेटी झाल्या. आता सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वेषांतरावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आता यावरुन एका शिवसेना खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे वक्तव्य केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी वेषांतर करुन अनेकदा अमित शाहांची भेट घेण्यावरुन टीका केली आहे. आता याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते, याचं उत्तम उदाहरण
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार नकली दाढी, मिशी, टोप्या आणि वेषांतर करुन फिरत आहेत. ते सर्वजण अल-रशीदची पोरं आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकार महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतर, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करुन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करता. CRPF ची सुरक्षा व्यवस्था अमित शाहांच्या हातात आहे. याचा अर्थ अमित शाहांनी CRPF ला यांना सोडा हे आधीच कळवलं होतं. दाऊद इब्राहिम, नीरव मोदी, विजय मल्या, मेहुल चौकशी, टायगर मेमन यांनाही असंच सोडलंय का? हा आता चिंतनाचा विषय आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
अजित डोवाल काय करत होते?
“CRPF च्या कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय कोणीही अशाप्रकारे जाऊ शकत नाही. अनेक मंत्र्यांना अडवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या कटात सहभागी असू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते. ते जेम्स बाँड आहेत ना, त्यांना हे कळलं नाही का? त्यांना विमानतळावरील सुरक्षा धोक्यात आली आहे, हे कसं समजलं नाही?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.