नवी दिल्ली | 09 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी पक्षासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादीची परीक्षा आहे. आज दोन महत्वाच्या सुनावणी होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं आहे. या सुनावणी दरम्यान काय होतं? याकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षावर आणि चिन्हावरही दावा केला. अशा परिस्थितीत अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल झाली. यावर आज सुनावणी होतेय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल.
राष्ट्रवादीसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आतापर्यंत केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. आता राष्ट्रवादी आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष न्यायलयात दिसणार आहे. राजधानी दिल्लीत आज दोन सुनावणी होत आहेत. एक आमदार अपात्रतेची आणि दुसरी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची.
आज निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. याआधी मागच्या शुक्रवारीही एक सुनावणी झाली होती. यावेळी युक्तिवाद करताना शरद पवार यांच्यावर अजित पवार गटाकडून गंभीर आरोप करण्यात आले. शरद पवार यांनी हुकुमशाहीपद्धतीने पक्ष चालवल्याचा आरोप केला.शरद पवार परस्पर पत्रक काढायचे आणि नियुक्त्या करायचे, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. तर शरद पवार गटाने एक मागणी या सुनावणी दरम्यान केली होती. राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवू नये, अशी मागणी केली होती. या प्रकरणी आता आज दुसऱ्यांदा सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायलयातही आज राष्ट्रवादी संदर्भात महत्वाची सुनीवणी पार पडेल. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होतेय. अजित पवार गटातील 41 आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.