Rahul Gandhi Speech : तुम्ही महिलांचं दु:खही समजू शकत नाही!; मणिपूरच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सरकारला सुनावलं
Rahul Gandhi Speech in Parliament : राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा छेडताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला विचारले परखड सवाल... म्हणाले, तुम्ही महिलांचं दु:खही समजू शकत नाही...
नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज संसदेत वापसी झाली. त्यानंतर पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांनी तडाखेबाज भाषण केलं. यात त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. मणिपूरमध्ये सरकारने भारताची हत्या केली. माझ्या भारतमातेची हत्या केली, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं.
राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा छेडताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ घालायला पाहायला मिळाला. यावेळी राहुल गांधी यांनीही जोरदार पलटवार केला. तुम्ही महिलांचं दु:खही समजू शकत नाही…, असं म्हणत राहुल गांधी आक्रमक झाले.
मी मणिपूर या शब्दाचा उच्चार केला, मात्र सत्यात आज मणिपूर अस्तित्त्वात नाही. मणिपूरला तुम्ही तोडलं.त्याचे दोन भाग केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूर आता राहिलेलं नाही तुम्ही त्याचे दोन भाग केलेत. पंतप्रधान मोदी मणिपूरला गेले नाहीत. पण मी मणिपूरला गेलो. कारण ती माझी माणसं आहेत. त्यांचं दु:ख मी जाणून घेतलं, असं राहुल गांधी म्हणाले.
मणिपूरबाबत मोदी सरकारचे लोक खोटं बोलतात. पण मी सत्य सांगतो. मी मणिपूरला गेलो होतो तेव्हा तिथल्या महिलांनी, तरूणांनी, लहान मुलांनी मला वास्तव सांगितलं. एका महिलेनं सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर मुलाला गोळी झाडली. ते दृश्य आठवून माझ्यासमोर ती महिला बेशुद्ध झाली होती. घटना सांगतानाच ती बेशुद्ध झाली होती.मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केलीये, असं राहुल गांधी म्हणाले.
मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर राहुल गांधींचं भाषण यांनी आज दमदार भाषण केलं. गौतम अदानींवर बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सत्ताधाऱ्यांना आज घाबरण्याचं कारण नाही. सत्ताधाऱ्यांने रिलॅक्स राहावं. आज दिमाग से नहीं दिल से बोलुंगा… मी आज अदानींवर बोलणार नाही, मी अदानींवर बोलल्यास सत्ताधाऱ्यांना त्रास होईल, असंही राहुल गांधी म्हणाले.
देश समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेलो.देश समजून घेण्यासाठी मी मोदी सरकारच्या जेलमध्ये जायला तयार होतो. भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा माझ्या मनात अहंकार होता. दुसऱ्याच दिवशी माझा अहंकार नष्ट झाला. भारत देश अहंकार नष्ट करतो, असंही ते म्हणाले.
आज तुमच्यावर जोरदार टीका करणार नाही. भारत जोडो यात्रा संपलेली नाही, मी लडाखलाही जाणार आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.