नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. सुप्रीम कोर्टात आमची 2 प्रकरणं सध्या चालू आहेत. कोर्टाने आधीच अध्यक्षांना निर्देश दिले आहेत. 11 तारखेला 3 महिने पूर्ण होत आहेत. विधानसभा अध्यक्ष ज्या अर्थी वेळ लावत आहेत. त्या अर्थी कायद्याने हे सर्व आमदार अपात्र होत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
कोर्टात आम्हाला न्याय मिळेल असा वाटत आहे. आम्हाला आता सर न्यायाधिशांकडून काही अपेक्षा आहेत. अनेक घटनात्मक पद दबावात काम करत आहेत, हे आपण वारंवार पाहिलं आहेच, असं संजय राऊत म्हणालेत.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल गळफास घेत आत्महत्या केली आहे. एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. त्यांच्या अकाली जाण्यावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केलं आहे.
नितीन देसाई यांच्यासारख्या एका कलादिग्दर्शकाला आत्महत्या करावी लागते, हे दुर्देवी आहे. अनेक सिनेमे त्यांनी केले आहेत. अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. एका बाजूला या देशातून हजारो कोटी रुपये घेऊन लोक परदेशात जात आहेत आणि एक मराठी माणूस आत्महत्या करतो हे दुर्देवी आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
एन डी स्टुडिओचं स्वप्न विखुरताना दिसत असताना त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. नितीन देसाई यांच स्वप्न हे मराठी माणसाचं स्वप्न आहे. त्यावर राज्य सरकारने विचार करावा. त्यांच्या स्टुडिओला चित्र नगरीचा दर्जा द्यावा, असं संजय राऊत म्हणाले.
रानकवी ना. धों महानोर यांचं आज निधन झालं. 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महानोर यांच्या जाण्याने तीव्र दु:ख झाल्याची भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ना. धों महानोर यांचं जाणं मनाला चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या निधनाने आम्ही व्यथित झालो आहोत. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.