शरद पवारांविषयी आदर, म्हणून भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडला का?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल
Sanjay Raut on PM Narendra Modi : शरद पवार, राष्ट्रवादीतील फूट अन् पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य; काय म्हणाले संजय राऊत? वाचा सविस्तर....
नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य केलंय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल विचारला आहे. शरद पवारांविषयी आदर होता म्हणून भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडला का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. मोदीजी, तुम्ही तुमच्या पक्षातील बघा… तुम्ही लालकृष्ण अडवाणी यांना मार्गदर्शक मंडळात का टाकलं?,असाही सवाल राऊतांनी विचारला आहे.
शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काल राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र NDA ची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी शिवसेना-भाजप युती तुटण्यावर भाष्य केलं. 2019 ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलं.
आम्ही शिवसेनेची साथ सोडली नाही, असं ते म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. आपण वेगळे झालो आहोत हे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल करून सांगितलं. पंतप्रधान यांनी काही गोष्टी तपासून बोलावं. महापुरुषांच्या साक्षीने तरी अस मोडून तोडून बोलू नये, असंही राऊत म्हणाले.
या देशात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. तरी हिंदू-मुस्लिम करत आहेत? देशात दंगे का होत आहेत? काँग्रेसच्या काळात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है… असं भाजप म्हणत होतं. आता मागच्या दहा वर्षापासून तुमचं सरकार आहे. मग हिंदू खतरे में कसा आला? का आला? जर हिंदू खतरे में है, तर राजीनामा द्या, असा घणाघातही राऊतांनी केला आहे.
नरेंद्र मोदी सामना वाचतात. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यांना अजूनही शिवसेनेची दखल घ्यावी लागते. सामनातील भूमिका शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहे. त्यांना यासाठी दखल घ्यावी लागते. कारण आम्ही ओरिजनल आहोत. सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत. हे त्यांनी बोलून दाखवलं आहे, असंही राऊत म्हणालेत.