बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे समोर आलं. हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. “नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबईतील विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा राज ठाकरे यांचा केवळ तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन असल्याचा दावा सावंत यांनी केलाय. (Arvind Sawant criticizes Raj Thackeray’s stance on renaming NM International Airport)
राज ठाकरे यांचा हा केवळ तर्क आहे. नवी मुंबईचं विमानतळ खरं तर नवीन आहे. हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असल्याचा मतितार्थ त्यांनी काढला, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांना किती आदर आहे हे समोर आलं. हे खेदजनक असून, वाईट वाटत असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांच्या नावावर राजकारण नको- सावंत
दि. बा. पाटील यांनी चांगलं काम केलं यात वादच नाही. जातीचं आणि समाजाचं राजकारण काही लोक करत आहेत. दि. बा. पाटील यांचं नाव वेगळ्या प्रकल्पासाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करु नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारण बाजूला ठेऊन सगळ्या पक्षांना आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत म्हणूनच नाव देत आहोत. जे जर आज असते तर प्रश्नच नसता, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या नावे स्मारक उभं राहत आहे, त्याचा अभिमान बाळगा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
राज ठाकरेंची भूमिका काय?
“प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची.. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं.” असे राज ठाकरे म्हणाले.
“मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं, जीव्हेकेंना मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार,” अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.
संबंधित बातम्या :
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी
Arvind Sawant criticizes Raj Thackeray’s stance on renaming NM International Airport