नोटाबंदीनंतर अमित शाह आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत काळा पैसा आला : सिद्धू
पुणे : माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुण्यात येऊन विविध विषयांवर फटकेबाजी केली. सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन त्यांनी सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्यात. या संस्था सरकारच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर नोटाबंदीनंतर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि ग्रामविकासमंत्री पंकजा […]
पुणे : माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुण्यात येऊन विविध विषयांवर फटकेबाजी केली. सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन त्यांनी सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्यात. या संस्था सरकारच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर नोटाबंदीनंतर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकात काळा पैसा आल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यात भारती अभिमत विद्यापीठात पत्रकार परिषदेत सिद्धू बोलत होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी नोटाबंदीवरुन भाजपला लक्ष्य केलं. नोटाबंदीने हजारो लोक बेरोजगार झालेत. देशाची अर्थव्यवस्था ही रोखीवर अवलंबून आहे. 93 टक्के नागरिक कॅशचा व्यवहार करतात. मात्र कॅशलेस हा तुघलकी निर्णय घेतल्याचा आरोप सिद्धू यांनी केला.
“भाजप नेत्यांच्या बँकेत काळा पैसा”
सरकार काळा पैसा हा देशात लपवून ठेवल्याचं म्हणत होतं. मात्र काळा पैसा हा परदेशात सोनं, स्थावर मालमत्तामध्ये असून हा पैसा देशात आला नसल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. ज्येष्ठ विधिज्ञ जेठमलानी यांचे स्वीस बँकेत करोडो रुपये असल्याचं सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. 1400 नागरिकांचा पैसा स्वीस बँकेत असून हा पैसा आला का, असा सवाल सिद्धू यांनी केलाय.
नोटाबंदी नंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी पाच दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंतीभाई आणि पंकजा मुंडे यांच्या बँकांत पैसा जमा झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केलाय.
“पश्चिम बंगालमध्ये ठोकशाही”
पश्चिम बंगालमधील सरकार आणि सीबीआय वादावर बोलताना सिद्धू यांनी सीबीआय कठपुतळी बनल्याचा आरोप केलाय. सरकार खरं दाबून टाकत आहे. मात्र खरं दबणार नाही. सरकारने लोकशाहीला ठोकशाही, गुंडातंत्र बनवलंय. तर देशद्रोही बनवून काहींना तुरुंगात टाकलं, तर काहींवर गोळ्या झाडल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. देशातील संस्थाना राहू, केतूचं ग्रहण लागलंय. मात्र यामुळे विरोधी पक्षांना एकत्र येण्यास मदत होईल. सरकार मनगटशाही करत असून अहंकार आलाय, मात्र विनाश होणार असल्याचा दावा सिद्धू यांनी केला.
“अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा”
यावेळी सिद्धू यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीका केली. अण्णा हजारे यांना काही घ्यायचं नाही, तर अण्णा विचारधारा देणारे व्यक्तिमत्व आहे. अनेकांना मुख्यमंत्री बनवलं असून मी अण्णाचा आदर करत आहे. अण्णा निष्काम सेवक असून अण्णांना याबदल्यात काही नको असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय.
“प्रियांका गांधींमुळे ऊर्जा मिळेल”
प्रियांका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी प्रियंकात असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. प्रियांका गांधी बहार असून सकारात्मक ऊर्जा आहे. प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली असून ती काट्याची वाट आहे. प्रियांका यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधी यांचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.
“विराट एक नंबर खेळाडू”
क्रिकेटवर बोलताना त्यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं. क्रिकेट विषय निघाल्यावर मी भावूक होतो. सध्याचा संघ आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट संघ आहे. विराट कोहली हा एक संस्था असून दबावात सर्वोत्तम खेळ करतोय. कसोटी क्रिकेटमधे खरी क्षमता पणाला लागते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत हरवलं आहे. विराट कोहली एक नंबर क्रिकेटर असून मानसिक फार कणखर असल्याचं म्हणत त्यांनी विराटचं कौतुक केलं.