“आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी…”, नवनीत राणा यांच्या उल्लेखाने भुवया उंचावल्या
"मी दिवस रात्र एक केल्यानंतरही काही विचारांमुळे माझा पराभव झाला. त्यामुळे आता कमळ किंवा महायुती यांचा जो कोणी उमेदवार उभा राहिल, त्याच्या पाठीशी एकनिष्ठतेने उभं राहिलं पाहिजे", असे नवनीत राणा यांनी म्हटलं.
Navneet Rana Statement on Devendra Fadnavis : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेंबांधणी करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, महायुती आणि महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा असणार, अशा चर्चा रंगताना दिसत आहे. यातच आता माजी खासदार नवनीत राणा यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. “आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी”, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. त्यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केले. “आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं आहे. माजी हा शब्द काही चांगला नाही. तो खूप रुतणारा आहे”, असे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
“फडणवीस त्यांच्या पूर्ण निष्ठेने काम करतात”
“आम्ही ज्यांच्यासोबत आहोत, त्यांच्यासोबत 100 टक्के सोबत आहोत. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अजून काही लाख मत पडली असती, तर आपले जास्त खासदार निवडून आले असते. पण उमेदवार कसाही असला तरी फडणवीस त्यांच्या पूर्ण निष्ठेने काम करतात”, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
“काही विचारांमुळे माझा पराभव”
“मी लोकसभेत जाऊ शकले नाही, पराभूत झाले. एक खंत राहिली. पण काँग्रेसचे राहुल गांधी हिंदूंना हिंसक म्हणतात. राहुल गांधींच्या चुकीच्या प्रचारामुळे बऱ्याच चांगल्या लोकांचा पराभव झाला. तिसऱ्यांदा नापास झालेले राहुल गांधी उत्सव साजरा करत आहेत. मी दिवस रात्र एक केल्यानंतरही काही विचारांमुळे माझा पराभव झाला. त्यामुळे आता कमळ किंवा महायुती यांचा जो कोणी उमेदवार उभा राहिल, त्याच्या पाठीशी एकनिष्ठतेने उभं राहिलं पाहिजे”, असे नवनीत राणा यांनी म्हटलं.
“…तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच” – रामदास आठवले
दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल एक वक्तव्य केले होते. “जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा वाद मिटला नाही, तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.