Navneet Rana : संजय राऊतांचे नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, राणांनी डी गँगशी संबंधित लखडावालाकडून कर्ज घेतलं?
आधीच जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे. नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंधित लखडवाला याच्याकडून कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
मुंबई : एका प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहे. नवनीत राणा यांनी डी गँगशी (D Gang) संबंधित लखडावाला याच्याकडून कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच आता केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून यात लक्ष घालणार का? असा सवालही संजय राऊतांनी केला आहेत. काही दिवसांपूर्वीच या लखडावालाचं जेलमध्ये निधन झाले आहे. त्यामुळे एका प्रकरणात आधीच जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर राऊतांच्या या आरोपानंतर चौकशीचा नवा सिसेमिरा लागणार का? तसेच या आरोपाबाबत नवनीत राणा यांची कोणतीही बाजू समोर अजून आलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाबाबत राणा काय स्पष्टीकरण देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र राऊतांच्या या आरोपांनंतर पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.
संजय राऊत यांचे आरोप नेमके काय?
नवाब मलिक यांच्यावरून टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊतानीही त्याच स्टाईलने उत्तर दिले आहे. संजय राऊतांनी ट्विटरवरून आरोप करताना म्हटले आहे की, नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते, ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. याच लकडावालाला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याचे डी गँगशी संबंध होते. आता माझा सवाल आहे की, ईडीने याची चौकशी केली का? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे!, असा खळबळजनक दावा आणि सवाल संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचे ट्विट
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे। मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
आता नवा वाद पेटणार?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदुत्वावरून वाद सुरू आहे. त्यात हनुमान चालीसाचा मुद्दा पुढे आल्याने राजकारण आणखी तापलं. हे प्रकरण आता राणा दाम्पत्याला जेलपर्यंत घेऊन गेलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक होत महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले आहेत. मात्र आता संजय राऊतांच्या आरोपांनी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते सतत राष्ट्रीय सुरक्षा आणि डी गँग यांच्यावरून नवाब मलिक आणि राज्य सरकारवर टीका करत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच स्टाईलमध्ये त्यांच्यावर पलटवार केला आहे.