अमरावती : राज्यात हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa)सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान चालीसा मशिदीसमोर लावावा, असं फर्मान मनसैनिकांना सोडलं. यानंतर सुरू झालेल्या राजकारणात आता खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी देखील उडी टाकली आहे. उद्या सकाळी नऊ वाजता ‘मोतीश्री’वर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. ‘हनुमान जयंतीच्या दिवशी चालीसा वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. महाराष्ट्रावर अनेक संकट आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून संकट आलं आहे. त्यांचं विघ्न हटवण्यासाठी चालीसा वाचण्याची गरज आहे,’ असं राणा यावेळी म्हणाल्यात. यावेळी आमदार रवी राणा (MLA Ravi Ran) यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे. दरम्यान, बाळासाहेब निघून गेले त्यांच्यासोबत शिवसेनेची विचारधाराही निघून गेल्याचा घणाघात नवनीत राणांनी शिवसेनेवर केलाय.
खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेसह थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलीय. ‘त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचायला सांगावा. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाही. वीजेचं संकट आहे, बेरोजगारी आहे, शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आहे. त्यावर भाष्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल तरीही ते मंत्रालयात येत नाहीत.’ अशीही टीका राणांनी केली.
नवनीत राणा यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केलाय. ‘बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भाजत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच. इथेच वाढले. विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे शिवसैनिक माझं काही करू शकत नाही. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्याचं काम शिवसैनिक करत आहेत.’ असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्यात.
पत्रकार परिषदेदरम्यान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांनी पेशन्स ठेवले नाही. एवढं कष्ट करण्यापेक्षा दोन पावलं पुढे या. मुख्यमंत्र्यांना सांगा कायदा सुव्यवस्था का बिघडवता. मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार. शिवसैनिकात दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामागे दम आहे हे पाहावं लागेल.’ असा इशारा नवनीत राणा यांनी यावेळी दिला.
इतर बातम्या
Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉय निसर्गाच्या सान्निध्यातील फोटो शेअर करत म्हणाली…
गोव्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; फातोर्डा स्टेडियमवरचे पत्रे उडाले