उद्धव ठाकरे यांच्या सभा मंडपासमोरच हनुमान चालिसाचं पठण, राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक; राड्याची शक्यता
यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अकोला आणि अमरावतीत जाणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी काल विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमरावतीत राडा होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे अमरावतीत आल्यास त्यांच्या सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला आहे. राणा समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राणा समर्थकांनी अमरावतीत हनुमान चालिसा पठणाचे पोस्टर्स लावले होते. हे पोस्टर्स ठाकरे समर्थकांनी फाडून टाकले.
तसेच ठाकरे समर्थकांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अमरावतीतील स्वागताचे पोस्टर्स फाडले आहे. अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील हे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
घाव वर्मी लागला
राणा विरुद्ध ठाकरे हा वाद अजूनही थांबलेला नाही. हा वाद अजूनही पेटलेला आहे. मुंबईतील मातोश्री निवास्थानाबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचं पठण केलं होतं. त्यामुळे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या दोघांना 14 दिवस तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याचा घाव राणा दाम्पत्याच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे अमरावतीत येणार असल्याने राणा दाम्पत्यांकडून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे.
त्यामुळेच उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत, त्या ठिकाणापासून काही अंतरावरच हनुमान चालिसाचं पठण केलं जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी राणा दाम्पत्य आणि त्यांच्या समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारलेली आहे. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बरसाती मेंढक
दरम्यान, रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बरसाती मेंढक असा केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडले नाहीत. कोरोनाच्या काळात राज्याला वाऱ्यावर सोडून ते मातोश्रीवर बसले होते. आता परत अमरावती जिल्ह्यात येऊन बरसाती मेंढक्या सारखे येऊन मताची भीक मागत आहेत. मुख्यमंत्री असताना काहीच केलं नाही. आता तर तुमचे 40 आमदार सोडून गेले ते फक्त हनुमान चालीसाला विरोध केला म्हणून. त्यामुळे तुम्ही विदर्भात कितीही आले तरी जनता तुम्हाला ओळखून आहे. तुम्ही फक्त बरसाती मेंढक आहात, अशी टीका राणा यांनी केली आहे.